त्यांचे अनुयायी यांना काबा मंदिरांत आम्ही येऊ देणार नाहीं, अशी त्यांनी प्रतिज्ञा केली. मक्कावाले मुहंमदांच्या तळाभोवती घिरट्या घालीत होते. एखादा एकटाच आढळला तर त्याला ठार मारतां यावें म्हणून टपून बसत. कांहींनीं पैगंबरांवरहि दगड फेकले, बाण मारले. यांतील कांहीं पकडले गेले व मुहंमदांसमोर आणले गेले. पैगंबरांनी त्यांना क्षमा केली. नंतर कुरेशांकडे पैगंबरांनी उस्मानला पाठविलें. त्याला कुरेशांनी धरून पकडून ठेवलें! मुहंमदांस यादवी थांबवावयाची होती. त्यांनी कुरेशांना कळविलें, तुमच्या अटी काय त्या कळवाव्या. कांहीं करार करूं. शेवटीं एक करार झाला. दहा वर्षेपर्यंत दोघांनी आपसांत लढावयाचें नाहीं असें ठरलें. तसेंच कुरेशांपैकीं बिगरपरवाना कोणी मुहंमदांकडे आला तर त्यांनी त्याला पुन्हां कुरेशांच्या स्वाधीन करावें. परंतु मुसलमानांपैकी कोणी मक्केत मक्केवाल्यांकडे गेला तर त्याला मुहंमदांकडे परत पाठवायला कुरेश बांधलेले नाहीत. कोणत्याहि जातिजमातीस, मुहंमदांस वा कुरेशांस मिळण्याची मुभा असावी. या वेळेस मुसलमानांनी परत जावें. पुढील वर्षी काबादर्शनास यावें. तीन दिवस मक्केत रहावें. हत्यारांसह यावें. अशा अटी ठरल्या. कुरेशांकडचा एक दूत मुहंमदांकडे आला होता. पैगंबरांविषयीं सारे किती पूज्यभाव, भक्तिभाव दाखवतात तं पाहून तो चकित झाला! तो परतल्यावर कुरेशांस म्हणाला, "अनेक राजे-महाराजे यांचे दरबार मी पाहिले, परंतु कोणाहि राजामहाराजाला असा मान दिलेला मी पाहिला नाहीं. अशी आदरबुद्धि कोणाविषयीं दाखविलेली मला दिसली नाहीं."
करार झाला. कुरेशांनी कराराप्रमाणे आपल्यांतील मुहंमदांकडे गेलेल्या कांही लोकांची ताबडतोब मागणी केली. मुहंमदांनी त्यांना पाठविले. कांहीं लोक असंतुष्ट झाले. परंतु मुहंमद दूरवर पाहणारे. नम्रतेनें ते जिंकू पहात होते. सरळता व उदारता दाखवून जिंकू पहात होते. मुहंमद अनुयायांसह मदिनेस परत आले.
आपला नवीन धर्म, साधा, सरळ, उदार बंधुभावाचा धर्म, सर्व जगानें घ्यावा असें मुहंमदांस वाटू लागलं. त्यांनी अनेक राजेरजवाड्यांकडे दूत पाठविले. हा नवधर्मामृताचा पेला घ्या, असे त्यांनी सर्वांना लिहिलें. ग्रीकांचा सम्राट हिरेक्लिअस व इराणचा खुश्रू पर्विझ यांच्याकडेहि दूतपत्रे देऊन
११८ ।
पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१३४
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे