Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुहंमदांची ही सुंदर आज्ञा, परंतु ज्यूंच्या धर्मस्थापकाने काय सांगितले होते? "जा आणि अमलकांवर हल्ला करा. सारे नष्ट करा. स्त्रिया, पुरुष, लहान अंगावरचं मूल, कोणी ठेवू नका. सारी मारा. गुरेढोरे मारा. वृद्ध, तरुण सारे मारा." मुहंमदांची उदारता खरोखरच अपार व अपूर्व होती. कधींहि तुकडी पाठवायची झाली तर ते सांगत, "दुबळ्यांना धक्का नका लावू. घरांतील निरपराधी लोकांस मारूं नका. स्त्रियांना वांचवा. अंगावर पिणारी मुलं त्यांची हत्त्या नका करूं. प्रतिकार न करणाऱ्यांची घरेदारे पाडूं नका. त्यांच्या उपजीविकेचीं साधने नष्ट नका करूं. फळझाडे तोडूं नका. ताडांची झाडे, तीहि नका तोडूं."
 पैगंबरांची ही शिकवण पुढील खलिफांसमोरहि असे. अबुबकर जो पुढें पहिला खलिफा झाला, त्याने यझीद बीन अबु सुफीयन याला जेव्हां बायझंटाइनांवर स्वारी करायला पाठविलें तेव्हां पुढील शिकवण दिली:
 "यझीद, स्वतःच्या लोकांना असंतुष्ट व अशान्त करूं नको. त्यांच्यावर कोणताहि जुल्म नको करूं. त्यांचाहि सल्ला घेत जा व योग्य तें करीत जा. मी सांगतों आहे याविरुद्ध जे वागतील त्यांना यश येणार नाहीं. शत्रूशीं गांठ पडल्यावर मर्दासारखे वागा. पाठ नका दाखवूं. आणि विजयी झालेत तर स्त्रिया, वृद्ध व मुले यांना मारूं नका. फळझाडे, ताडाची झाडे तोडूं नका. शेतें जाळू नका. गुरेढोरें मारूं नका. पोटासाठीं जरूर पडली तरच तीं मारा. शत्रूशी करार कराल तर तो पाळा. दिल्या शब्दाप्रमाणे वागा. धर्मप्रवृत्तीचे लोक मठांतून वगैरे असतात. एकान्तांत ईश्वराची सेवा, पूजा करतात. त्यांना त्रास देऊं नका. मारूं नका. मठ उध्वस्त करूं नका."
 किती संयमी हे आज्ञापत्र ! शांतीचा संदेश देणाऱ्या ख्रिस्ताच्या अनुयायांच्या लीला व ख्रिस्ती शासकांचीं आदेशपत्रे- आगलावीं आदेशपत्रे वाचलीं म्हणजे पैगंबर व त्यांचे अनुयायी यांचीं हीं त्या काळांतील शासनें किती उदात्त वाटतात! चीनमध्ये एकोणिसाव्या व विसाव्या शतकांत सुधारलेले म्हणवणाऱ्या ख्रिश्चन राष्ट्रांनी कशा कत्तली केल्या, ग्रंथालये, कलालये कशीं जाळलीं तें वाचा आणि मग मुहंमदांकडे पहा. त्यांनी शिकवलेल्या उदार धर्माकडे पहा.

回 回 回




११६ ।