Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पणाचा त्याच्यावर अत्यन्त परिणाम झाला. तो शत्रुत्व विसरून अत्यंत निष्ठावंत अनुयायी झाला. मुहंमदाचा भक्त होऊन तो गेला. तो मग आपल्या प्रान्तांतून मक्कावाल्यांस धान्य वगैरे पाठविनासा झाला. मक्केत धान्य मिळेना. मक्कावाल्यांची मोठी करुणस्थिति झाली. शेवटी त्यांनी मुहंमदांकडे अर्ज पाठविला. आणि मुहंमद द्रवले. जे मक्कावाले त्यांना पुनःपुन्हा मारण्यासाठीं उठत होते. त्यांना जगविण्यासाठी मुहंमद उभे राहिले. त्यांनी त्या निष्ठावंत अरबाला, थुमामला सांगितलें कीं, मक्कावाल्यांस लागेल ते देत जा. अपकारांची फेड ते प्रेमाने व क्षमेनें करते झाले. मुहंमदांनी पुढे जेव्हां मक्का घेतली त्या वेळेस हब्रार नांवाचा एक खुनी मुहंमदांसमोर आणण्यांत आला. एकदां मुहंमदांची एक मुलगी मक्केहून निसटून जात होती. ती उंटावर बसणार इतक्यांत हा कुरेश हब्रार तेथें आला. त्यानें त्या मुलीच्या अंगांत भाला खुपसला! ती गरोदर होती. ती जमिनीवर पडली व लगेच मेली. स्वतःच्या गरोदर मुलीचा निर्दय खून करणारा तो हब्रार विजयी मुहंमदांसमोर उभा करण्यांत आला. पैगंबरांस त्या प्रिय कन्येचं स्मरण झाले. हब्रार मुहंमदांच्या पाया पडला व क्षमा मागता झाला. मुहंमदांना तो पश्चात्ताप खरा वाटला. त्यांनीं क्षमा केली. कारण तो अपराध त्यांच्या वैयक्तिक बाबतींतला होता. त्या अपराधाचा शासनसंस्थेशी संबंध नव्हता. पैगंबर स्वतःच्या बाबतीतले सारे अपराध क्षमा करीत. शासनसंस्थेचा संबंध येई तेथे ते कठोर बनत. ते कठोर कर्तव्य त्यांना करावें लागे. एका ज्यू स्त्रीनं मुहंमदांस मारण्याचा प्रयत्न केला. तिलाहि त्यांनी क्षमा केली. अबु जहलचा मुलगा अक्रमा यानेंहि हाडवैर मुहंमदांजवळ केलें. परंतु तरीहि त्याला क्षमा केली गेली. पैगंबरांचे महानुभावित्व असीम होते. पैगंबर या नात्यानें त्यांनी सदैव क्षमाच केली; परंतु शास्ते या नात्याने त्यांना तत्कालीन परिस्थितीमुळे कठोर व्हावे लागले. ज्यूंनीहि पुनःपुन्हा त्यांना सतावले, फसवलें, दगलबाजी केली. नाहीं तर मुहंमद किती सौजन्याने वागूं पहात होते! तोंडहि प्रार्थनेच्या वेळेस जेरुसलेमकडे करीत!
 कांहीं ख्रिश्चनधमीं बेदुइनहि मदिनेस त्रास देऊं लागले. लुटालूट व रस्तेमार करीत. त्यांच्या बंदोबस्तासाठीं मुहंमदांनी जी तुकडी पाठविली, तिच्या प्रमुखास ते म्हणाले, "कोणाला फसवू नका. दगलबाजी कोणाशी करूं नका. दिला शब्द पाळा. लहान मुलांना तर तुम्ही हात नाहींच लावतां कामा."

इस्लामी संस्कृति । ११५