Jump to content

पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/९९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ८९ )
नारायणराव व्यंकटेश.

शिवाय आलेली नाहीं, ही शेजारीण आमच्या घरांतल्या गोष्टी पेशव्यांस विपरीत प्रकारानें समजाविते व त्यामुळें आपणांस पीडा होतें, हा जिजाबाईंचा पक्का ग्रह झाला होता. त्यानीं अनूबाईंस निरोप पाठविला कीं, कुसाबाई गरोदर आहे किंवा नाहीं या गोष्टीचा तुम्हास संशय असल्यास तुम्हीं स्वतःच कोल्हापुरास येऊन खात्री करून घ्यावी !

 पेशव्यांच्या इराद्यास अडथळा करील असा जबरदस्त सरदार राज्यांत आतां कोणी राहिला नव्हता. त्यांतले त्यांत मुरारराव घोरपडे गुत्तीकर हाच आपलें काम कांहीं करील तर करील असें मनांत आणून जिजाबाईंनीं त्यास अनुकूल करून घेण्याचा उद्योग केला. त्यांस तोर्गलचा किल्ला व जहागीर देण्याचेंही त्यानीं कबूल केलें होते. मुलेंमाणसें ठेवण्यास स्वदेशीं एखादें बंदोबस्ताचे ठिकाण आपले म्हणून असावें हा मुराररावांचा फार दिवसांचा हेतु होता. शिवाय जिजाबाईंची आज्ञा त्यास वंद्य होतीच. यामुळें तो यांस अनुकूळ होऊन फौज जमा करून मडकशिऱ्याहून निघून सोंडूर येथे येऊन राहिला. मागें ताराबाईंनीं साताऱ्यास दमाजी गायकवाड आणविला त्याप्रमाणेंच करवीरचें राज्य राखण्याकरितां तेथें मुराररावास आणण्याचें कारस्थानें याप्रमाणे जिजाबाईंनी केलें होतें. परंतु गायकवाडापेक्षां मुरारराव अधिक सावधपणानें वागणारा सरदार होता. पेशव्यांचे सामर्थ्य तो जाणून होता. एकदम दंडेलीवर न येतां त्याने जिजाबाईंविषयीं पेशव्यांशी सामोपचाराचे बोलणें सुरू केलें होतें. घोरपड्यांच्याच करामतीवर भिस्त ठेवून जिजाबाई स्वस्थ होत्या असें नाहीं. त्यानीं निजामअल्लीसही अनुकूल करून घेण्याकरितां त्याजकडे सूत्र लाविलें होतें. शेवटीं घोरपडे किंवा निजामअल्ली यांच्या मध्यस्थीशिवायच जिजा-