पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/९८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(८८)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

केलें नव्हतें. त्या अवधींत त्या एकदोनदां पुण्यास गेल्या होत्या तेव्हां ह्यांच्या उच्च पदास अनुरूप असा बहुमान ठेवण्यांत अगर मिष्ट व लीन भाषण करण्यांत पेशव्यांकडून कमतरता कांहींच दिसली नव्हती. असें असतां संभाजीमहाराज वारले नाहींत तोंच राज्याची जप्ती करण्याकरितां पेशव्यांची फौज आलेली पाहून जिजाबाईंचा क्रोधाग्नी प्रज्वलित झाला ! तथापि त्यानीं तो आंतल्याआंत दाबून जप्तीची फौज परत नेण्याविषयीं पेशवे व नारायणरावतात्या यांस पत्रे पाठविलीं व कृष्णराव अमात्य यांच्या द्वारें अनूबाई इचलकरंजीस होत्या त्यांसही लिहून कळविले. परंतु " आतां पेशव्यांचीं लष्करें लांब बऱ्हाणपूरापलीकडे गेलीं आहेत, तेथून त्यांची उत्तरें येततोंपर्यंत जप्तीच्या कामावर आलेली फौज स्वस्थ बसणें अशक्य दिसतें, " असें उत्तर अनूबाईकडून करवीरास गेले त्याबरोबर जिजाबाईंनीं सामादि चतुर्विध उपायांपैकीं दंडाचा प्रयोग तत्काळ सुरू केला ! हरिराम व विसाजी नारायण या सरदारांस 'ठाणीं आज हवाली करितों, उद्यां करितों,' म्हणून त्यांनी नादीं लाविलेंच होते. इतक्या सुलभ रीतीने आपली एवढी दुर्घट कामगिरी पार पडणार म्हणून ते सरदार मनांत मांडे खात बेफामपणानें राहिले असतां जिजाबाईनीं अकस्मात् त्यांवर फौज पाठवून छापा घालून त्यांची धुळधाण उडविली व त्यांचे लष्कर लुटून घेतलें ! नंतर त्या इचलकरंजीकरांच्या राशीस लागून त्यांचीं गांव खेडीं लुटूं लागल्या. याप्रमाणें आवाडावी करीत असतां असतां त्यांनी पुकारा केला कीं, आपली सर्वांत धाकटी सवत कुसाबाई गरोदर आहे ! इचलकरंजी संस्थानावर करवीर दरबाराची पूर्वीपासून गैरमर्जी होतीच. तिकडचा व इकडचा कारभार बायकांच्या हातीं असल्यामुळें या प्रकरणीं अधिकच ईर्षा वाढली होती. आपल्या राज्याची जप्ती करण्याकरितां पेशव्यांची फौज आली ही अनूबाईच्या सांगण्या-