पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/९७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(८७ )
नारायणराव व्यंकटेश.

काय केलें, कसें वागलो, हेंही त्यांस भान राहिलें नाहीं ! करवीरचें राज्य घेंण्याची नानासाहेबांनीं हांव धरिली ही फार वाईट गोष्ट केली. सामान्य व्यवहारास नीतीचीं बंधनें आहेत तीं राजनीतीस लागू नाहींत असें म्हणतात. हे खरें असलें तरी दिलेल्या वचनाची ओळखही ठेवूं नये असा राजनीतीचा सर्वसंमत सिद्धांत असेल असें आम्हांस वाटत नाहीं ! त्यांतून जिजाबाईंनीं कोठें फंदफितूर केला असता तर हें वर्तन कांहीं तरी क्षम्य होतें ! परंतु येथें तशीही कांहीं सबब नव्हती ! असो. इचलकरंजीकरांचे सरदार हरिराम व विसाजी नारायण हे श्रीमंतांसमीपच होते. त्यांसच पांच सहा हजार फौज बरोबर देऊन श्रीमंतांनीं करवीरचें राज्य जप्त करण्याच्या कामावर पाठविलें. ते त्वरेनें येऊन वारणातीरीं पिरान कवठयापाशीं उतरले व राज्यांतले किल्ले व ठाणीं हवालीं करण्याविषयीं जिजाबाईंस तगादा करुं लागले !
 रांगणा व सामानगड वगैरे एक दोन किल्ले व दोन अडीच लक्षांचा मुलूख मात्र जिजाबाईंकडे ठेवून बाकी सर्व राज्य घ्यावें असा पेशव्यांचा मनोदय होता. तो सिद्धीस जाता तर सरंजामदार राजपथकी असल्यामुळें सातारच्या राजमंडळांतल्याप्रमाणें यांचेही सरंजाम चाललेच असते. इनामदारांसही कांहीं भय नव्हतें. येऊन जाऊन खालसा मुलूख होता त्यांपैकीं सुमारे तीनचतुर्थांश मुलूख पेशव्यांस मिळाला असता. बाकीचा एकचतुर्थांश मुलूख व एक दोन किल्ले देऊन ताराबाई साताऱ्यास होत्या त्याप्रमाणें जिजाबाईस निर्माल्यवत् करून रांगण्यावर बसवून ठेवावें, असा पेशव्यांनीं मनांत बेत योजिला असावा. परंतु जिजाबाई किती पाणीदार व कारस्थानी बायको होती हे त्यांनीं अजून ओळखिलें नव्हतें ! पेशव्यांच्या वचनावर विश्वास ठेवून गेलीं सात वर्षे जिजाबाईनी त्यांशीं विरुद्ध आचरण तिलप्राय