पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अंगीकृत कार्याच्या विशदीकरणार्थ त्या त्या दौलतींची हकीगत कारणपरत्वें त्या त्या स्थळी देणे मला योग्य वाटले. शाहूमहाराजांच्या मृत्यू आधीचे व नंतरचे प्रसंग संक्षेपाने वर्णिले असते व पेशवाईच्या घटनेसंबंधी कांहींच लिहिलें नसतें तरी चाललें असते; परंतु तो मजकूर घालण्याची कारणे मी तेथे तेथे दिली आहेत त्याने वाचकांचे समाधान होईल अशी उमेद आहे.

 इचलकरंजी संस्थानाचा इतिहास म्हणजे मराठी राज्यांतल्या अंतःकलहांचा व विशेषेकरून इचलकरंजी व करवीर या संस्थानांमधल्या कलहांचा इतिहास होय. असले कलह वर्णन करण्याचे काम फारसे उत्साहजनक नसते. शिवाय कलहास प्रवृत्त झालेल्या दोघांपैकी कोणा तरी एकाविषयीं पक्षपात होण्याचे भय असतें. तथापि आस्थेने मेहनत करून माहिती मिळवावी, आणि कोणाचाही बुद्धिपूर्वक पक्षपात न करितां जें खरं वाटेल तें निर्भीडपणे लिहावें, असा संकल्प करून हें काम आम्हीं हाती घेतले. ते आमच्या संकल्पाप्रमाणे कितपत तडीस गेले आहे हे ठरविणे वाचकांकडे आहे.

 हा ग्रंथ तयार करण्याच्या कामी इचलकरंजीचे:जुनें दप्तर, ऐ. ले. संग्रह, काव्येतिहास संग्रह, इतिहाससंग्रह, भारतवर्ष, राजवाडे यानीं प्रसिद्ध केलेले खंड, मोडकांचा इतिहास, डफ्, फॉरेस्ट, ग्रेहाम व वेस्ट यांचे ग्रंथ, व सरकारी गॅझेटियर यांतल्या माहितीचा व जुन्या माहितगारांनी दिलेल्या माहितीचा उपयोग करून घेतला आहे. या पुस्तकांत डफ् साहेबांच्या इतिहासाचा जेथे जेथे उल्लेख केला आहे तेथे तेथे तो इतिहास म्हणजे सन १८७३ मध्ये ‘ टाइम्स ऑफ इंडिया ' छापखान्यांत छापलेला ग्रंथ होय असे समजावें.

मिरज, ता० १९ मे स० १९१३.

वासुदेव वामन खरे.