करण्याचा बोजा नव्हता. हिंदुस्थानात सर्व संस्थान इनाम असल्याचें हे एकच उदाहरण माझा पहाण्यांत आहे. एका खेड्यापासून तो मोठ्या प्रांतापर्यंत पटवर्धनांच्या जहागिरी त्या कुलांतील पुरुषांनी केवळ तरवारीच्या जोरावर मिळविल्या आहेत व राखिल्या आहेत. इचलकरंजी संस्थानाचा प्रारंभ त्याच कारणाने झालेला असला तरी त्याचा विस्तार व रक्षण होण्याच्या कामी एका बुद्धिमान् बाईची ४० वर्षांची करामत खर्ची पडलेली आहे ! पटवर्धनांचा वतनदारीशी कांहीं सबंध नाही, पण इचलकरंजी संस्थानावरची बहुतेक संकटे वतनदारीमुळे प्राप्त झालेली आहेत ! हिंदुस्थानांतील लोकांची वतनावर अत्यंत आसक्ति असते असे परक्या लोकांनी आम्हांविषयीं वर्णन केलेले आहे. इचलकरंजीचा इतिहास वाचला म्हणजे त्या वर्णनाचा खरेपणा मनास चांगला पटतो ! करवीर राज्यांतलें सालिना चार हजार रुपयांचे भिकार देशमुखीचे वतन तें काय, आणि तें राखण्यासाठी इचलकरंजी संस्थानाने करवीरकरांशी तीन वर्षे लढाई करावी आणि पांच लक्ष रुपये खर्च करावे ! केवढा अल्प लाभ आणि केवढी मोठी हानि ! या लढाईला अन्य कारणेही आहेत, पण मुख्य कारण वतनदारी !
पटवर्धनी जहागिरी व इचलकरंजी संस्थान यांत वर लिहिलेल्या प्रकारची विसदृशता असल्यामुळे इचलकरंजी संस्थानाचा इतिहास ऐ. ले. संग्रहांत न आणितां त्याचा स्वतंत्रच ग्रंथ लिहावा असें मनांत आलें व त्याप्रमाणे शेवटच्या तीन प्रकरणांखेरीज बाकीचा सर्व इतिहास तयार करून पुष्कळ दिवस झाले. यंदां हा इतिहास छापण्याचा योग यदृच्छेनें आल्यामुळे सर्व ग्रंथ समाप्त करून वाचकांस सादर करीत आहे.
सातारचे महाराज, पेशवे व करवीरकरमहाराज यांच्या दौलतींच्या इतिहासांत इचलकरंजी संस्थानाचा उद्भव, विस्तार व त्यावर आलेली नानाविध संकटांची परंपरा यांची गुंतागुंत झालेली असल्यामुळें