Jump to content

पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/७९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(६९)
नारायणराव व्यंकटेश.

त्याप्रमाणें धनीपणाचें नातें गाजविण्याचें पाणी रामराजांच्या अंगीं नाही, असें दृष्टोत्पत्तीस येतांच त्यांस पराकाष्ठेचा क्रोध आला. त्या क्रोधाच्या भरांत त्यांनीं बिचाऱ्या रामराजांस साताऱ्याच्या किल्ल्यावर कैदेंत टाकून त्यांचे हाल हाल केले! रामराजे यांस सोडविण्याचा पेशव्यांनीं यत्न केला तों ताराबाई साताऱ्याचा किल्ला बळकावून बसल्या! पेशव्यांनी त्यांची पुष्कळ प्रकारें समजूत केली तरी त्यांनी आपल्या हयातींत रामराजे यांस कैदेतून सोडिलें नाहीं! पेशव्यांशीं मात्र त्यांनी बाह्यात्कारें ह्या वेळेपुरता समेट केल्यासारखे दाखविलें, परंतु आंतून त्यांचा द्वेष जागृत असल्यामुळे पेशव्यांविरुद्ध नवीं नवीं कारस्थाने रचण्यांत त्यांचे मन गुंग होतें! त्या काहीं दंगा करितील तर त्यांचा बंदोबस्त करितां यावा व करवीरच्या उपद्व्यापी लोकांवरही जरब रहावी, म्हणून पेशव्यांनी सन १७५० च्या पावसाळ्यांत इचलकरंजीकरांचे सरदार हरि राम व मानाजी पायगुंडे यांस तीन हजार फौजेनिशीं वारणेच्या तीरीं छावणीस ठेविलें होतें.
 शाहू महाराज मरण पावले त्या आधीं थोडे महिने निजाम उल्मुलुक वारला होता. त्याच्या गादीस हक्कदार नासिरजंग व मुजफरजंग झाले होते ते मारले गेल्यावर फ्रेंचांच्या मदतीनें सलाबतजंग गादीवर बसला. त्यावर स्वारी करण्याकरितां पेशव्यानीं मोंगलाई मुलुखाकडे चाल केली. त्या स्वारींत नारायणराव तात्या हजर होते. पेशवे व मोंगल यांची गांठ पडून युद्ध व्हावें, तों ताराबाईनीं साताऱ्यास दमाजी गायकवाड यांस आणविल्याची खबर आली; तेव्हां पेशव्यानीं नाना पुरंदरे वगैरे आपले सरदार साताऱ्यास होते त्यांच्या कुमकेस नारायणराव तात्यांस ताबडतोब पाठविलें. मागून जलदी जलदीनें आपणही आलेनंतर गायकवाडांचें पारिपत्य होऊन ताराबाईंची समजूत काढण्याचा उपक्रम झाला.