Jump to content

पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/७८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(६८)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

घेतलें. रामराजे यांस गादीचे धनी करून त्याचा मानमरातब उत्तम रीतीनें राखावा व त्यांच्या नांवानें तुम्ही कुल अखत्यारीनें राज्य संभाळावें, राज्यांत पुरातनपासून लहान मोठे सेवक आहेत त्यांचे सरंजाम चालवावे, कोल्हापूरचें राज्य निराळें राखावें, इतकाच त्या पत्रांतला आशय होता.
 आपला नातू गादीवर बसणार म्हणून ताराबाईंचें मन प्रसन्न होतें, तर इकडे सकवारबाई, संभाजीमहाराज व त्यांच्या पत्नी जिजाबाई यांचेही बेत पूर्णावस्थेस येत चालले होते! प्रतिनिधि व किरकोळ सरदार यांनीं साताऱ्यास व संभाजीमहाराजांनी कोल्हापुरास फौजही तयार केली होती. राज्याकरिता पेशव्यांशी मोठेंच रणकंदन माजविण्याचा या मंडळीचा बेत होता. पण शाहूमहाराज मरण पावतांक्षणीं पेशव्यांनी दादोबा प्रतिनिधीस पकडून बिड्या घालून डोंगरी किल्ल्यावर रवाना केलें आणि हं हं म्हणतां चोहोंकडे बंदोबस्तसुद्धा करून टाकिला ! त्यामुळें राजकुलांतील मंडळीच्या जिवाचा चडफडाट होऊन गेला तो काय वर्णावा ! सकवारबाईंनीं तर त्या त्वेषांत महाराजांच्या शवाबरोबर सहगमन केलें. पूर्वी ठरल्याप्रमाणें पेशव्यानीं रामराजांस साता-यास आणून सिंहासनावर आरूढ केलें.
 इतकें होतें तों प्रतिनिधींच्या मुतालिकानें बंड करून सांगोल्याचें ठाणें बळकाविलें. ते बंड मोडण्यासाठीं पेशव्यांचे चुलत बंधु सदाशिवराव भाऊसाहेब नूतन महाराजांस बरोबर घेऊन स्वारीस निघाले. त्या फौजेंत हरि राम या सरदाराच्या हाताखालीं इचलकरंजीकरांचें पथक चाकरीस होतें. मुतालिकाचें बंड मोडून महाराज व भाऊसाहेब साताऱ्यास परत आले. आपले नातू रामराजे हे राज्याचे धनी असल्यामुळें त्यांनी आपल्या नोकरास ह्मणजे पेशव्यांस आज्ञेंत वागवावें, असा ताराबाईंचा इरादा असणे साहजिक होतें.पण