माझ्या ऐतिहासिक लेख-संग्रहासाठीं मी पटवर्धन जहागीरदारांची जुनी दप्तरे वाचून पाहू लागलो तेव्हां पटवर्धनांशीं मूळपासून निकट संबंध असलेले इचलकरंजीकर घोरपडे यांचेही दप्तर वाचण्याची मला उत्कट इच्छा झाली. ती माझी इच्छा इचलकरंजी संस्थानाचे हल्लीचे अधिपति श्रीमंत रा. बाबासाहेब इचलकरंजीकर यांनी मोठ्या खुषीनें पूर्ण केली. इतकेंच नाही,तर आपल्या संस्थानच्या दप्तरांतून निवडक लेखांच्या नकला घेऊन त्या छापण्याचीही परवानगी दिली. त्याप्रमाणे या संस्थानच्या दप्तरांतल्या पुष्कळ पत्रे यादी आजपर्यंत ऐ. ले. संग्रहांत छापिल्या गेल्या आहेत व पुढेही छापिल्या जातील. ऐ. ले. संग्रहांत मुख्यतः पटवर्धन जहागिरीचा इतिहास व तत्संबंधाचे लेख प्रसिद्ध होत आहेत. इचलकरंजीचा इतिहासही पटवर्धनी जहागिरीच्या इतिहासाप्रमाणेच फक्त लढाया व स्वार्याशिकार्या यांच्या वर्णनांनीच भरलेला असेल व ऐ.ले. संग्रहांत त्याचा सहज समावेश करितां येईल असें प्रथम वाटलें होतें, पण इचलकरंजीचे दप्तर वाचून पाहिल्यावर खात्री झाली कीं, या संस्थानाचा इतिहास ऐ. ले. संग्रहांत पटवर्धनी जहागिरीचा इतिहास येत असतो, त्याहून बर्याच बाबतींत भिन्न आहे. जहागीर व संस्थान यांच्या स्थितींत जो भेद आहे त्यावरून ही इतिहासाची भिन्नता उत्पन्न झाली आहे.
पटवर्धनांच्या जहागिरी या लष्करी नोकरीकरितांच दिलेल्या असल्यामुळे त्यावर मध्यवर्ती सत्तेच्या नोकरीचा बोजा होता, पण इचलकरंजी संस्थान हें सर्व इनाम असल्यामुळे त्यावर कोणाचीही नोकरी