पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/६४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(५४)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास


त्यास हुसकून लाविलें. पुनः तीन वर्षांनी तोच अर्जोजी यादव चालून आला तेव्हांही व्यंकटरावांच्या सरदारांनी त्याशीं लढाई करून त्याचें शें पन्नास मनुष्य ठार व जखमीं केल्यामुळें तो फौजसुद्धां पळून गेला.
  गोव्याच्या स्वारीहून परत आल्यावर व्यंकटराव कांहीं दिवस साताऱ्यास होतें. त्यानंतर आणखीही एकदोन मोहिमांत ते नाना साहेब पेशव्यांच्या फौजेबरोबर चाकरी करीत होते असें त्या काळचा पत्रव्यवहार छापला गेला आहे त्यांतल्या कित्येक उल्लेखांवरून दिसतें. पण एखादी स्वतंत्र मोहीम पतकरून ती सिद्धीस नेण्याचे त्यांचे दिवस आतां निघून गेले होते. कारण कीं, सन १७४३ पासून त्यांच्या शरीरावर क्षयरोगाचा पगडा दिवसेंदिवस हळू हळू बसत चालला होता. या आजारांत एके जागीं राहूनस. १७४५त्यांच्या प्रकृतीस बरें वाटेना, म्हणून ते इचलकरंजी, नांदणी, टाकळी, उत्तूर या ठिकाणीं चाळून पाळून रहात असत. त्या काळीं देवधर्मावर व भुतांखेतांवर लोकांचा विश्वास फार असे. सदलगें येथें कोणी प्रसिद्ध देवरुषी होता त्याजकडून कांहीं दैवी उपाय करविण्यरितां ते सन १७७५ त कुटुंबसुद्धां जाऊन राहिले होते. तेथेंच त्यांच देहावसान झालें.
 व्यंकटराव हे शूर व कर्तृत्ववान् पुरुष होते हें त्यांच्या चरित्रावरून दिसतच आहे. तथापि एका युरोपियन राष्ट्राच्या मुलखावर स्वारी करून त्यानीं जय मिळविल्यामुळें मराठी राज्यांत त्यांच्या पराक्रमाची कीर्ति कदाचित् वाजवीपेक्षां अधिक झाली असेल असें वाटतें. करवीर व सातारा या दोन्ही दरबारांत त्यांचे वजन चांगलें असें. ते आपल्या दौलतीचीं व संसाराचीं कामें दक्षतेनें पहात असत असें त्यांच्या अनेक पत्रांवरून स्पष्ट होतें. इचलकरंजी संस्थानाच्या इतिहासांत त्यांनीं शाहूमहाराजांची स्वतंत्र सरदारी मिळविली ही गोष्ट महत्त्वाची