उभयपक्षीं मुळींच पाळिला गेला नाहीं हें दाखविण्यासाठीं आम्ही कलमवारीनें विवेचन करितों.
कलम १. हल्लीं सातारा जिल्ह्यांत बत्तीसशिराळ्याचा पेठा आहे त्यालाच पूर्वी वारुणमहाल हें नांव होतें. तो महाल तह झाला तेव्हां उदाजी चव्हाणाच्या ताब्यांत होता. पुढें शाहूमहाराजानीं चव्हाणाचें पारिपत्य करून त्यापासून तो महाल घेऊन प्रतिनिधींस दिला. महाराज वारल्यावर पेशव्यानीं तो महाल प्रतिनिधीपासून घेतला. तात्पर्यं करवीरकरांस तो महाल कधीं मिळाला नाही.
कलम २. तुंगभद्रेपलीकडच्या संस्थानांत शाहूमहाराजांच्या हयातींत एक स्वारी झाली होती. त्या वेळीं तिकडील संस्थानांपासून मिळालेल्या खंडणीचा हिस्सा करवीरकरांस मिळाला नाहीं. पुढें पेशव्यानींही तुंगभद्रेपलीकडें पुष्कळ स्वाऱ्या केल्या, परंतु करवीरकरांस कधीं हिस्सा दिला नाहीं. त्या स्वाऱ्यांतून करवीरकरांची फौजही कधीं हजर नव्हती. असती तर खंडणीचा हिस्सा मिळाला असता. फक्त सोंधे व बिदनूर या संस्थानांची खंडणी मात्र संभाजीमहाराजांस मिळत होती. पण पुढें तीही वसूल करवेना म्हणून त्यानीं ती घेण्याचा हक्क पेशव्यांस देऊन टकिला.
कलम ४. तहाप्रमाणें करवीरकरानीं वडगांवचे ठाणें पाडलें नाहीं. पेशवाईंत तें ठाणें मजबूत असल्याबद्दल प्रसिद्धि होती.
कलम ६. वारणा-कृष्णेच्या संगमापासून निवृत्तिसंगमापर्यंत ( कृष्णा तुंगभद्रा यांच्या संगमापर्यंत ) मुलूख संभाजीमहाराजांस दिल्याचें या कलमांत लिहीलें आहे याचा अर्थ इतक्या टापूंत तुम्हीं स्वारी शिकारी करून मिळेल तो मुलूख मिळवावा अगर या सर्व टापूंतील चौथ सरदेशमुखी होईल तर वसूल करावी एवढाच होता.