पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/५०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ४० )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

पाडाव सांपडले असतां त्यांस सोडवून नेणें ही इज्जतींची गोष्ट असल्यामुळें भगवंतराव अमात्य यांस संभाजीमहाराजांनी खंडाचा पैका भरून लौकरच सोडवून नेलें. व्यंकटरावांची त्यांनीं कांहींच वास्तपुस्त केली नाही याचें कारण ते आतां त्यांचे सरदार नसून यापूर्वींच शाहूमहाराजांकडे मिळालेले होते. या वेळीं व्यंकटराव अडचणीच्या प्रसंगांत सांपडले होते. ज्या अर्थी ते भरलढाईत शत्रुपक्षाकडे असलेले सांपडले होते त्या अर्थी ते शत्रु नसले तर बंडखोर असले पाहिजेत असें समजून प्रातिनिधि त्यांस कैदेंतून मुक्त करीत ना! शेवटीं बाजीराव पेशव्यांनीं प्रतिनिधींस दहा हजार रुपये खंड भरून आपले मेहुण्याची सुटका करून घेतली!
 यापुढें शाहूमहाराजांनीं आपल्याजवळ राहण्याविषयीं व्यंकटरावांस आज्ञा केल्यावरून साताऱ्यास त्यांचें नेहमीं राहणें पडूं लागलें.पूर्वी त्यांचें पथक पांचशें स्वारांचें असतां मागून सातशें स्वारांचे झालें ते याच वेळी झालें असावें. त्या पथकास सरंजाम महाराजांनीं पूर्वी लावून दिला होता त्यांतच या वेळीं आणखी कडलास, पापरी व बेडग हे गांव लावून दिले, व वाडा बांधण्याकरितां शहर सातारा येथे जागा दिली, आणि पाडळी येथें एक चाहूर जमीन व मौजे शिरगांव प्रांत वाई या गांवाचा मोकासा इनाम दिला. महाराजांनीं नेमून दिलेल्या जाग्यांत व्यंकटरावांनीं वाडा बांधिला व पेठ वसविली त्या पेठेस अद्यापि व्यंकटपुरा हें नांव प्रसिद्ध आहे.
 सर्व मराठी राज्यावर वारसा सांगण्याचा - निदान शाहूमहाराजांच्या बरोबरीनें राज्याची वांटणी घेण्याचा - आजपर्यंत संभाजी महाराजांचा हेका होता, पण वर सांगिल्याप्रमाणें वारणातीरीं पराभव झाल्यावर त्यांनीं तो नाद सोडून दिला. मराठी राज्यांत दुय्यम प्रतीचा धनीपणा पतकरून शाहूमहाराजांशीं कशाही प्रकारें समेट करू