Jump to content

पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/४२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(३२)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास

आतां व्यंकटरावांची सांपत्तिक स्थिति व राजकीय संबंध कसे काय होते हें पाहूं. नारोपंतांच्या हयातींत सेनापतींकडून व इतरांकडून इचलकरंजी, आजरें, आरग, मनेराजुरी, म्हापण, बहिरेवाडी व शिपूर इतकीं खेडीं त्यांस इनाम मिळालेलीं होतीं. शिवाय तर्फ आजरें येथील एकतर्फी खेडयांची वहिवाट व प्रांत मिरज येथील देशमुखीची वहिवाट सेनापतींकडून नारोपंताकडे चालत होतीं. हें सारें उत्पन्न त्या काळची स्थिति लक्षांत घेतां सालिना तीस चाळीस हजारांवर नसावें असें वाटतें. नारोपंत हे गरिबींत जन्म पावून गरिबीनेंच वाढलेले असल्यामुळें इतकें कायमचें उत्पन्नही त्यांस उणें भासलें नसेल. शिवाय करवीर राजमंडळापैकीं सचिवाचें पद यांस मिळालें होतें त्याचा सरंजाम ते उपभोगीत होते, व सेनापतीच्या संस्थानाचा कारभार त्यांजकडे असल्यामुळें त्यासंबंधीही त्यांची प्राप्ति बरीच असावी. पण नारोपंत वारल्यावर संभाजीमहाराजांनीं सचिवाचें पद व्यंकटरावांस दिलें नाहीं व सेनापतींनींही त्यांच्या हातीं कारभार ठेविला नाही. याप्रमाणें जमेच्या बाबी कमी झाल्या तरी खर्चाच्या बाबी वाढत जाणें अपरिहार्य होतें. नारोपंतांच्या गरिबीची स्थिति व्यंकटरावांस लागू नव्हती. ते गर्भश्रीमंत असून शिवाय पेशव्यांचे जांवई होते, यामुळें आपल्या योग्यतेनुरूप इतमाम संभाळण्यासाठीं त्यांस अधिक खर्च ठेवणें अवश्यच होतें. करवीरच्या दरबारात त्यांची शिफारस होऊन अधिक दौलत मिळावी असे दिवस राहिले नव्हते, कारण कीं, नारोपेतांचे पुरस्कर्ते रामचंद्रपंत अमात्य* हे यापूर्वींच वारले होते. पिराजीराव सेनापतीचें


  • रामचंद्रपंत स० १७२९ त वारल्याचे कोल्हापूर ग्याझेटियरमध्यें लिहिलेलें आहे तें चुकलें आहे. बावडें संस्थानाचा एक संक्षिप्त इतिहास लिहिलेला आहे त्यांत रामचंद्रपंत स. १७२० त पन्हाळा मुक्कामीं वारले असें लिहिले आहे तेंच बरोबर आहे. त्यांच्या नांवें छत्रपतींनीं दिलेल्या सनदा आहेत. त्यांत स. १७२० नंतरची एकही नाहीं. त्या सालानंतरच्या सनदा त्यांचे पुत्र भगवंतराव यांच्या नांवें दिलेल्या आहेत.