प्रांत हुकेरी येथील देसाई व नाडगौडा लखमगौडा वल्लद बसवप्रभु याची नारोपंतानीं त्याच्या वतनावर स्थापना केल्यामुळें कृतज्ञ होऊन त्यानें त्यांस जागनूरची पाटिलकी व बहिरेवाडी हा सबंध गांव इनाम दिला.
याप्रमाणें नारोपंतांच्या चरित्रांत ठोकळ गोष्टी सांगण्यासारख्या होत्या त्या येथपर्यंत संक्षेपानें सांगितल्या आहेत. त्यांचें समग्र चरित्र समजण्यास बखरी व टिपणें व अस्सल पांच दहा पत्रें याशिवाय कांहीं आधार नाही ही दुर्दैवाची गोष्ट होय. राजाराममहाराज व ताराबाई यांच्या कारकीर्दीचा कच्चा पत्रव्यवहार अंशतः जरी पुढें कधीं काळीं सांपडून प्रसिद्ध झाला तरी सुद्धां त्यावरून नारोपंतांच्या चरित्रावर उत्तम रीतीचा प्रकाश पडेल. असो. तूर्त उपलब्ध माहिती आहे तीवरून सुद्धां ते मोठे तेजस्वी, कर्तृत्ववान् व दैवशाली पुरुष होते असें दिसून येत आहे. ते कधीं मरण पावले हे नक्की सांगता येत नाही. एका टिपणांत ते सन १७२८ मध्यें मरण पावल्याचे लिहिलें आहे, पण तें संभवनीय नसून आमच्या मतें ते सन १७१६ ते १७२० या दरम्यानच्या अवधींत मृत्यु पावले असले पाहिजेत.
नारोपंत मरण पावले तेव्हां त्यांच्या कुटुंबाचीं माणसें बहिरेवाडी तर्फ आजरें येथे रहात होतीं. पंतांच्या मृत्यूचें वर्तमान पिराजीराव घोरपडे सेनापति यांस कळतांच ते बहिरेवाडीस आले. पंतांची स्त्री लक्ष्मीबाई व पुत्र व्यंकटराव यांची भेट झाल्यावर ते फार कष्टी झाले व व्यंकटरावांस बोलले कीं, "आमचे वडिलांनीं नारोपंतांस