Jump to content

पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/३६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २६ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

मिळालें तें कधीं मिळालें हें जरी नक्की सांगतां येत नाहीं, तरी त्याचा अजमास करितां येण्याजोगा आहे. कारण कीं, शंकराजी नारायण सचिव हे शाहू महाराजांस न मिळतां ताराबाईच्याच पक्षास चिकटून राहिले होते. ते सन १७११ त मरण पावल्यावर त्यांचे पुत्र नारोशंकर हे शाहू महाराजांस अनुकूल झाल्यामुळें त्यानीं त्यांजकडे सचिवाचें पद कायम केलें. त्यामुळें करवीरच्या राजमंडळांतलें सचिवाचें पद रिकामें झालें. तेव्हां रामचंद्रपंतांनीं छत्रपतींकडून नारो महादेव यांस त्यावेळी सचिव पद देववून तीं उणीव भरून काढिली असावी.
 श्रीवर्धनचे देशमुख बाळाजी विश्वनाथ भट हे कोंकण सोडून राजाराम महाराजांच्या कारकीर्दीतच घांटावर आले होते. इकडे आल्यावर त्यानीं महत्वाची कामें करून लौकिक मिळविला होता. कांही दिवस ते पंतसचिवांचे कारभारी होते व अलीकडे शाहू महाराजानीं त्यांस धनाजी जाधवराव सेनापति यांचे कारभारी नेमिलें होतें. सन १७१० त जाधवराव सेनापति मरण पावल्यावर शाहू महाराजानीं बाळाजीपंतांस 'सेनाकर्ते’ असें पद देऊन एक दोन मोहिमांवर फौज बरोबर देऊन पाठविलें होते. बाळाजीपंत नानांस बाजीराव, चिमाजी आप्पा, भिऊबाई व अनूबाई अशी चार अपत्ये होती. यापैकीं अनूबाईंचे वय ६|७ वर्षाचे झाल्यावर त्या काळच्या संप्रदायाप्रमाणें ती उपवर झालीसें पाहून बाळाजीपंत तिला योग्य स्थळ धुंडीत होते. नारो महादेव यांचें पुत्र व्यंकटराव यांचें लग्न व्हावयाचे होते व तो वर आपल्या कन्येस योग्य आहे हें बाळाजीपंतांच्या लक्षांत आले.नारोपंतांसही हा श्र्लाघ्य संबंध प्रिय वाटला व त्यांचे उपाध्ये हरभटजीबावा यांच्या विद्यमानें बोलणें होऊन अनूबाई व व्यंकटराव यांचा विवाह स.१७१३ साली सातारा मुक्कामीं झाला.