पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/३४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(२४)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

 कापशीकर घोरपड्यांचा एकंदर सरंजाम सत्तावीस लक्षांचा होता, त्याचा तिसरा हिस्सा नऊ लक्ष रुपये उपन्नाचा संताजीरावांस मिळालेला होता; परंतु त्यांचे पुत्र पिराजीराव यांचे ताब्यांत हल्लीं सुमारें पांच लक्ष उत्पन्नाचां मुलूखच राहिला होता. इतका मुलूख तरी नारोपंतांच्या मर्दुमीमुळेंच त्यांच्या धन्याकडे राहिला. छत्रपतीनीं व इतर मराठे सरदारानीं बाकीचा मुलूख घेतला तो घेतलाच. अलीकडे कापशीकर आपल्या पक्षास चिकटून राहिल्यानें आपल्या राज्याला किती उपयोग होत आहे हें ताराबाईंच्या प्रत्ययास आल्यामुळें त्यानीं प्रसन्न होऊन प्रांत मिरज व पन्हाळा येथील देशमुखी व सरदेशमुखीचें वतन पूर्वी संताजीराव सेनापतींस दिलेले होतें तेंच पुनः त्यांचे पुत्र पिराजीराव यांजकडे कायम केले. या वतनाचा सर्व कारभार नारोपंतानीं पिराजीरावांकडून आपल्या नांवें करून घेतला होता. मिरज प्रांताच्या सरदेशमुखीची वहिवाट त्यानीं सखोसोनो व रायाजी होनो या नांवाच्या दोघा कारकुनांस सांगितली होती.
 सन १७०९ - १० चे सुमारें नारोपंतानी आपला पुत्र व्यंकटराव याची मुंज केली, त्या वेळीं पूर्वींचे उपाध्ये केळकर म्हणून होते यांजकडून उपाध्येपण काढून हरभटजीबावा पटवर्धन यांस दिलें. बावांवर त्यांची भक्ति पूर्वींपासून जडली होतीच. त्यांत हा नवीन संबंध जोडला गेल्यामुळें अधिकच घरोबा होण्यास कारण झालें व त्यापासून नारोपंत व हरभटजी या उभयतांच्याही वंशजांचे हित झाले आहे. त्या वेळीं पटवर्धन यांचें राहण्याचें ठिकाण स्वतःचें नसल्यामुळें हरभटजी व त्याचे बंधु व सारे पुत्र हे बहिरेवाडीस नारोपंतांजवळच राहत असत.
 व्यंकटरावांची मुंज झाल्यावर नारोपंतांनीं पन्हाळा प्रांताच्या सरदेशमुखीचा कारभार पिराजीरावांकडून त्यांच्या नांवें करून दिला,