पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/३३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २३ )
नारो महादेव.

मदत करीत असत. सातारा घेतल्यानंतर शाहूमहाराजानीं किल्ले घेत घेत येऊन रांगण्यास वेढा घातला. त्यांपुढें आपला निभाव लागत नाहीसें पाहून रामचंद्रपंतानीं ताराबाई व राजसबाई व त्यांचे दोन पुत्र यांस चोरवाटेनें बाहेर काढून मालवणाकडे लावून दिलें व नारोपंत व पिराजी घोरपडे यांसह आपण आंत राहून कित्येक महिनेपर्यंत किल्ला झुंजविला. शेवटीं किल्ला अगदीं जेरीस आला तेव्हां वेढा घालणाऱ्या फौजेत धनाजी जाधवराव होते त्यांस वेढा उठवून महाराजांस घेऊन जाण्याविषयीं त्यांनी निरोप पाठविला. त्यावरून जाधवरावानीं शाहूमहाराजांची समजूत घालून सर्व लष्करासह त्यांचें तेथून कूच करविलें.
 शाहूमहाराज रांगण्याहून निघून परत साताऱ्यास जातात तों ताराबाईंची स्वारी मालवणाहून करवीरास आली. ताराबाई सामान्य बायको नव्हती. शाहूमहाराजानीं येऊन त्यांची इतकी धुळधाण केली तरी शाहू हा संभाजीमहाराजांचा पुत्र नसून कोंणी तोतया आहे व आपला पुत्र मात्र सर्व मराठी राज्याचा मालक आहे असें दुनियेंत स्थापित करण्याचा इरादा त्यानीं सोडिला नव्हता. त्यानीं करवीर क्षेत्र आपली राजधानी करण्याचें ठरविले व पूर्वीच्या अष्टप्रधानांपैकीं कांहीं प्रधान शाहूमहाराजांकडे गेल्यामुळे आपले नवीन प्रधानमंडळ नेमिलें. याप्रमाणे नवीन राजधानी व नवीन अष्टप्रधान त्यानीं ईर्ष्येने मुद्दाम नेमून शाहूमहाराजांशी सतत वैर चालविण्याचा निश्चय केला. त्यांचे पुत्र शिवछत्रपति हेच मराठी राज्याचे योग्य वारसदार असून त्यांचे अष्टप्रधान हेच राज्यांतले खरोखरीचे अष्टप्रधान होत, असा जो त्यानीं हेका धरिला तो कितपत सिद्धीस गेला हें पुढें यथाप्रसंगीं सांगण्यांत येईल.