पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/३२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २२ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

आपल्या पक्षास अधिक बळकटी आणण्याची इच्छा करूं लागल्या. या वेळीं पिराजी घोरपडयांचें वय १६-१७ वर्षांचें असावें. त्यांच्या फौजेची सरदारी व दौलतीचा कारभार नारोपंतच करीत होतें व ते नेहमीं रामचंद्रपंत अमात्य यांच्या धोरणानें व सल्लामसलतीनें वागत असत. गेलीं अठरा वर्षे औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूशीं झगडून रामचंद्रपंतानीं मराठी राज्य संभाळलें होतें, परंतु रामचंद्रपंत ताराबाईंचे मुख्य कारभारी होते तरी अलीकडे त्यांचा त्यांवर विश्वास नव्हता. त्यांची सारी भिस्त परशुराम त्रिंबक प्रतिनिधि यांजवर होती. प्रतिनिधि व रामचंद्रपंत यांचें वैमनस्य होतें. त्यामुळें रामचंद्रपंतानीं जो कारभार करावा तो प्रतिनिधींनीं ताराबाईस भलतेंच समजावून मोडवावा असें नेहमीं होऊं लागलें. त्यामुळें रामचंद्रपंत यांस राग येऊन त्यानीं शाहूमहाराजांस कांहीं उत्तेजनपर निरोप पाठविला.
 तें वर्तमान ताराबाईंस कळतांच त्यानीं रामचंद्रपंतांच्या पायांत रुप्याची बेडी घालून त्यांस वसंतगडावर कैदेंत ठेविलें. त्या योगानें रामचंद्रपंतांस अर्थातच अधिक क्रोध येऊन त्यानीं धनाजी जाधवराव वगैरे मराठे सरदार फितूर करून त्यास शाहूमहाराजांकडे पाठवून दिलें. परशुरामपंत प्रतिनिधि लढाईच्या इराद्यानें शाहूमहाराजांवर चालून गेला होता, परंतु लढाईत जाधवराव वगैरे सरदार तिकडे मिळालेले पहातांच तो पळून साताऱ्यास आला. नंतर शाहूमहाराजांनीं येऊन साताऱ्यास वेढा दिला व तो किल्ला घेऊन परशुरामपंतास कैद केलें. हें वर्तमान येतांच ताराबाईंनीं रामचंद्रपंतांस कैदेंतून सोडून रांगण्यास आणिलें व आपला मुलगा शिवाजी व आपली सवत राजसबाई हिचा मुलगा संभाजी या दोघांस त्यांच्या मांडीवर बसवून राज्यसंरक्षण करण्याविषयीं त्यांचीं विनवणी केली. तेव्हां रामचंद्रपंत पुनः राज्यकारभार चालवूं लागले. नारोपंतही त्यांस उत्तम रीतीनें