Jump to content

पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/२६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १६ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

धन्यानें आपणास पुत्र म्हणविलें व आपले परोपरीनें कल्याण करून आपणास नांवारूपास आणिलें; त्याअर्थी त्याच्या उपकारांतून उत्तीर्ण होण्याची वेळ हीच आहे; हें जाणून त्यानीं राणोजी व पिराजी यांस हातीं धरून सेनापतींचे अनुयायी एकत्र जमविले व बहिरजी हिंदुराव घोरपडे निराळी सरदारी करून कर्नाटकांत होते त्यांस आणविलें. मग ही घोरपडयांची एक स्वतंत्रच फौज जमा झाली असें पाहून जाधवरावानीं त्यांशीं विरोध करण्याचें सोडून दिलें.
 सन १७०० त राजाराममहाराज मरण पावले. यानंतर त्यांचें कुटुंब ताराबाई राज्यकारभार चालवूं लागल्या. घोरपडे ताराबाईच्या ताब्यांत न राहतां नेहमीं स्वतंत्रपणें मोंगलाई व मराठी राज्यांत स्वाऱ्या करीत, असें डफ् साहेब म्हणतात; परंतु ते खरें दिसत नाही. कारण कीं सुरु सन आर्बा मय्या व अल्लफ ( सन १७०३|४ ) या सालीं ताराबाईंचे पुत्र शिवछत्रपति यानीं पिराजी घोरपडे यांचे नांवें सरंजामजाबता करून दिला आहे त्यांत कलमें आहेत ती-

  1. " मशारनिल्हेचे पिते राजश्री संताजी घोरपडे यांस मामले मिरज येथील अठरा कर्यातीचे देशमुखी वतन दिली होती तेणेंप्रमाणें यांजकडे करार करून दिलें. "
  2. " सरदेशमुखीचें वतन मशारनिल्हेचे पेशजीपासून होतें तेणेंप्रमाणें करार. बितपशील सुभा पन्हाळा व मामले मिरज. "
  3. " मशारनिल्हेचे वडील बंधू राजश्री राणोजी घोरपडे स्वामिकार्यावरी पडले त्यानिमित्त त्यांची स्त्री संतूबाई घोरपडी इजवरी कृपाळू होऊन तिचा योगक्षेम चालण्यानिमित्त कसबे कापशी सुभा आजरें हा गाव कुलबाब कुलकानू देखील इनाम दिलें. "