पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/२५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १५ )
नारो महादेव.

जाग्यांत माने याच्या स्त्रीनें दोनशे बरकंदाज दबा धरून बसविले होते, त्यांनीं संताजीराव व त्यांबरोबरची बहुतेक मंडळी गोळ्या घालून ठार केली ! कांहीं जीव बचावून पळून आले, त्यानीं नारोपंतांस ही हकीकत सांगितली. त्यावरून त्यांनीं परत जाऊन संताजीरावांच्या व इतर मंडळीच्या प्रेतांस अग्निसंस्कार देवविला, ही गोष्ट इ. स. १६९८ सालीं झाली.
 ज्याच्या नांवाची औरंगजेबास दहशत असे, ज्याचा दुंदुभीध्वनी कानी पडतांच मोठमोठाल्या मोंगल फौजांनीं गर्भगळित होऊन जावें, ज्याच्या प्रतापानें शत्रुपक्षींच्या लक्षावधी योद्ध्यांच्या स्त्रियांस वैधव्यदीक्षा दिली, असा तो धुरंधर योद्धा संताजीराव सेनापति याप्रमाणें मारेकऱ्यांच्या हातें प्राणांस मुकला ! पण मत्सरानें ग्रासलेल्या त्याच्या शत्रूंस तो मरण पावल्यानें कापशीकर घोरपडयांचें नांव बुडेल अशी जी आशा होती ती मात्र सफळ झाली नाहीं ! संताजीरावांचे मुलगे राणोजी व पिराजी हे जरी त्या वेळीं लहान होते तरी त्यांचा थोरला मुलगा नारोपंत घोरपडे हयात होता तोपर्यंत कापशीकारांचें नांव बुडण्याचा संभव नव्हता ! जेथपर्यंत भरभराटीचा काळ असतो तेथपर्यंत आप्त, इष्ट, मित्र पायलीचे पंधरा आपण होऊन येऊन चिकटत असतात. पण विपत्ति प्राप्त झाली म्हणजे खरोखरीचा मुलगा असला तरी बापास विचारीत नाहीं ! मग मानलेला कोठून विचारणार ! पण ही गोष्ट सामान्य लोकांची आहे. जे महात्मे आहेत त्यांच्या वर्तनांत वैभव किंवा विपत्ति यांच्यायोगाने तिळमात्र विपर्यास होत नाही. नारोपंत हे अशाच महात्म्यांपैकीं एक होते. धन्यास दगा देऊन ते जाधवरावास मिळते तर राजाराममहाराज छत्रपति यांची मर्जी त्यांजवर सुप्रसन्न झाली असती व त्यांस वैभवही मोठें मिळाले असतें. परंतु त्यांची बुद्धी तशी नव्हती !