पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/२३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १३ )
नारो महादेव.

या नवीन उपनामाविषयीं एक आख्यायिका आहे ती अशी--एकें दिवशी संताजीराव भोजनास बसले असतां त्यांच्या थोरल्या बायकोनें विनोद केला कीं, नारोपंतांस तुम्ही आपला पुत्र म्हणतां तर आमच्या लोकांच्या चालीप्रमाणें त्यानें तुमच्या ताटांत बसून भोजन करण्यास काय हरकत आहे? संताजीरावही विनोदानेंच म्हणाले, काय हरकत आहे? नारोपंत, जेवावयास येऊन बैैस. नारोपंतही तें त्यांचे बोलणें मनापासूनच आहे असें समजून तत्काळ येऊन जेवावयास बसले! यज्ञोपवीतांत हात घालून नारोपंत तें तोडणार आणि अन्नाचा घांस घेणार, असें पाहतांच संताजीरावानीं सांगितलें कीं, पुरे, तुझी परीक्षा झाली. माझा लेंक म्हणवून घ्यावयास तुला स्वजातिच टाकिली पाहिजे असें नाहीं! त्या दिवसापासून नारोपंत आपणास घोरपडे म्हणवूं लागले असें सांगतात. ही आख्यायिका खरोखरच घडली असेल वा नसेल, पण धन्याचे आडनांव घेण्याला केवळ सहभोजनाचीच जरूरी होती असें मात्र मुळींच नाही. धन्याशीं नोकरीचा चिरकालिक निकट संबंध असला तर त्याचें आडनांव नोकराला सुद्धा लोक आपोआप लावूं लागतात, असेंही घडतें. मराठे जातीच्या धन्यांचीं आडनावें घेतलेली ब्राह्मणांची कुळें पुष्कळ सांपडतील. मिरजेस घोरपडे उपनांवाचे ब्राह्मण आहेत ते देशस्थ आहेत. काळे, गोरे, बागल, पोळ, सावंत, थोरात वगैरे आडनांवें मराठयांची असून ब्राह्मणांचीही आहेत, याची उपपत्ति याच प्रकाराने होते. संताजीरावानीं नारोपंतास आपला पुत्र म्हणाविलें होतें ही गोष्ट जगप्रसिद्धच आहे. परंतु नवल वाटण्याजोगी ही गोष्ट आहे कीं, कापशीकर व इचलकरंजीकर यांमध्ये झालेल्या जुन्या काळचा पत्रव्यवहार आम्हीं पाहिला आहे, त्यांत पहिल्या तीन सेनापतींनीं म्हणजे संताजीराव, पिराजीराव, राणोजीराव यांनी इचलकरंजीकरांस 'चिरंजीव' मायन्याची व इचलकरंजीकरांनीं त्यांस 'तीर्थरूप' मायन्याची