पंधरा दिवस मार खातांच ती मोगलांची फौज टेंकीस आली. शत्रुस शरण जाणें बरें न वाटल्यामुळें विष खाऊन कासिमखानानें प्राण दिला. बाकीचे सर्व सरदार व फौज संताजीरावांचें हातीं लागली, तेव्हां त्यांनीं ती लुटून फस्त केली. व सरदारांपासून भारी खंड घेऊन त्यांस सोडून दिलें. त्या फौजेची अशी दुर्दशा झाली असतांही नुकताच पराजित होऊन गेलेला सरदार हिंमतखान बादशहाकडून नवी फौज घेऊन नव्या उमेदीनें लढाईस आला; परंतु संताजीरावानी तीही फौज मोडून धुळीस मिळविली, त्यास मारून टाकीलें व त्याचें बाजारबुणगें वगैरे दरोबस्त लुटून घेतलें. त्या चंदीच्या स्वारींत संताजीरावांच्या फौजेंत म्हसवडकर माने म्हणून सरदार होता, त्यानें कांही फितूर केला असें आढळल्यावरून संताजीरावानीं त्यास हत्तीच्या पायीं देऊन मारून टाकिलें.
याप्रमाणे येथपर्यंत ज्या ज्या अचाट पराक्रमाच्या मसलती संताजीरावानीं केल्या त्यांत नारो महादेव यांच्या कर्तृत्वाचा अंश किती
होता ही विश्वसनीय माहिती मिळत नाही, परंतु तो बराच असला पाहिजे हें निर्विवाद आहे. इचलकरंजी संस्थानाच्या बखरी लिहिलेंल्या आहेत, त्यांतून तर नारो महादेव यांची करामत प्रत्येक मसलतींत जवळ जवळ संताजीरावांच्या बरोबरीची होती असें वर्णिलें आहे. पण तें म्हणणें अक्षरशः खरें मानण्यास अन्यत्र प्रत्यंतराचा पुरावा मिळाला पाहिजे. संताजीरावानीं नारो महादेव यांस आपल्या फौजेचा व दौलतीचा सर्व कारभार सांगितला होता व तेही इमानेंइतबारें त्यांची चाकरी करीत होते, तसेंच संताजीरावांचे त्यांजवर निस्सीम प्रेम जडलें होतें, ते त्यांस आपला पुत्र म्हणत असत व नारोपंतांचीही त्यांशीं वागणूक पुत्राच्या नात्यानेंच असे, या गोष्टी मात्र खऱ्या आहेत. आतां त्यांचे जोशी हें उपनाम लोपून घोरपडे असें उपनांव पडलें होतें.
पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/२२
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(१२)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.