पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/२१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(११)
नारो महादेव.

एक तीन फौजा त्यानीं मोडूनं लुटून गर्दीस मिळविल्या. तिकडे चंदीस राजाराममहाराज होते त्यांचें पारिपत्य करण्याकरितां औरंगजेबानें झुलपिकारखान वगैरे नामांकित सरदार व प्रचंड सेना पाठविली. तेव्हां संताजीराव छत्रपतींची कुमक करण्याकरितां पुनः कर्नाटकांत सन १६९६ त गेले. त्यांबरोबर धनाजी जाधवरावही होते व फौज वीस हजार होती. चंदी कांहीं थोडया मैलांवर राहिली तेव्हां संताजीरावांनी सात आठ हजार फौजेसह जाधवरावांस जलदी-जलदीनें पुढे पाठविलें. जाधवराव चंदीस पोहोंचतांच त्या किल्ल्यास मोंगलाचें लष्कर वेढा घालून बसलें होतें त्यावर त्यानीं हल्ले करून त्यास हैराण केलें. संताजीराव मागून हळू हळू मजलांनी येत असता त्यांवर त्या प्रांताचा मोंगल फौजदार अल्लीमर्दानखान चालून आला. त्या प्रसंगीं मोठे युध्द होऊन संताजीरावानीं त्या फौजदाराचां पूर्ण पराजय करून त्याची फौज लुटून टाकिली व त्यास पकडून जबर खंड घेऊन सोडून दिलें. नंतर चंदीस पोंचल्यावर त्यानीं मोंगलावर वारंवार तुटून पडून त्यांस चंदीचा वेढा उठविणें भाग पाडिलें. नंतर ते कर्नाटक, बालेघांट या प्रांतांत शिरून तेथें लुटालूट करूं लागले. तेथील फौजदार कासिमखान यास त्यांशीं युद्ध करण्याची छाती होईना; सबब त्याच्या कुमकेस बादशहानें विजापुराहून जंगी फौज देऊन मोठे मोठे सरदार पाठविले. ते कासिमखानास येऊन मिळाल्यावर ती सर्व सेना संताजीरावांचा मुकाबला घेण्याकरितां निघाली, तोंच त्यांनी एकदम येऊन चोहोंकडून या मोंगल फौजेस घेरा दिला. संताजीरावांची ही मगरमिठी सुटेनाशी झाली तेव्हां त्या फौजेची सुटका करण्याकरिता बादशहानें हिंमतखान नांवाचा सरदार पाठविला, तों संताजीरावांनीं त्यास परस्पर वाटेंतच गांठून त्याची फौज मोडून उधळून दिली; पण कोंडलेल्या फौजेस तो आल्याची बातमीदेखील लागूं दिली नांहीं ! आठ