मे स० १८६४ रोजीं दत्तक घेऊन त्याचें नांव गोविंदराव आबासाहेब ठेविलें. दत्तकाच्या मंजुरीबद्दल करवीरदरबारास एक लक्ष सत्तर हजार रुपये नजराणा देण्यांत आला.
विद्याभ्यासाकरितां आबासाहेब प्रथम बेळगांवास व मागून पुण्यास राहिले होते. ते वयांत आल्यावर त्यांस त्यांच्या संस्थानाची मुखत्यारी ता० १६ सप्टेंबर स० १८७४ रोजीं मिळाली. आबासाहेब हे हुशार व होतकरू संस्थानिक होते. आपल्या संस्थानांत अनेक सुधारणा करण्याचे त्यांचे बेत होते. परंतु त्यांचे हे सर्व बेत दुर्देवानें जागच्या जागींच राहून ता० १५ फेब्रुवारी स.१८७६ रोजीं त्यांवर मृत्यूनें अकस्मात् घाला घातला ! संस्थानाच्या मुखत्यारीचा उपभोग त्यांनीं सारा सतरा महिने घेतला !
नारायणराव गोविंद ऊर्फ बाबासाहेब हे इचलकरंजी संस्थानाचे हल्लींचे अधिपति होत. यांची कारकीर्द हल्लीं चालू असल्यामुळें तिचे सविस्तर वर्णन करणें हें वस्तुतः इतिहासकाराच्या कर्तव्यकक्षेंत येत नाहीं. कारण कीं, ही कारकीर्द सांप्रतच्या पिढीच्या नजरेसमोरच असल्यामुळें तसें करण्याची गरज नाही. शिवाय विद्यमान मनुष्याविषयीं लिहितांना मनास वाटणारा संकोच हाही एक अडथळा आहेच.तथापि ग्रंथाची पूर्तता करण्याकरितां या संस्थानिकांच्या चरित्रांतल्या कांहीं ठळक ठळक गोष्टी व मुद्दे येथें नमूद करितों.