पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१९०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १८० )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

संस्थान आमच्या हवालीं करावें. एकदां दत्तक दिला तो मरण पावला या सबबीवर सरकारानें आम्हांस पुन्हा दत्तक देण्याचें नाकारिलें व संस्थान खालसा केलें, परंतु तात्यासाहेबांशीं सरकारनें स० १८४७ त पांच कलमांची यादी ठरविली तींत "कारणपरत्वें इचलकरंजीकर यांजला दत्तकाविशीं तजवीज करणें झाल्यास ह्याचा विचार सरकार करितील, आणि हुकूम देणें तो कोल्हापूर इलाख्याची-तशीच दक्षिण महाराष्ट्र देशाची–अशा प्रकरणीं वहिवाट असेल तीस अनुसरून सरकारास वाजवी तें कर्तव्य होईल," असें कलम आहे, व त्या कलमास अनुसरून पहातां आम्हांस सरकारांतून दत्तक घेऊं दिला पाहिजे हेंच सिद्ध होतें. कारण कीं, सरकाराने बावडा संस्थानास एकामागून एक तीन दत्तक घेऊं दिलेले आहेत व विशाळगड संस्थानासही एकामागून एक असें दोन दत्तक झालेले आहेत. हीं उदाहरणे कोल्हापूर इलाख्यांतलीं आहेत. याचप्रमाणें दक्षिण महाराष्ट्रांत कुरुंदवाड संस्थानपैकी वाडीकरांचा पोटसरंजाम आहे त्या या घराण्यांतही एकामागून एक असें दोन दत्तक झालेले आहेत. कोल्हापूर इलाख्याची व दक्षिण महाराष्ट्र देशाची वहिवाट जर या प्रकारची आहे, तर तीस अनुसरून आम्हांसही पुन्हा दत्तक घेऊं देण्याची परवानगी सरकारानें कां देऊं नये ?
 या गोष्टी मुंबईसरकारास माहीत नव्हत्या असें नाही. परंतु त्यांकडे दुर्लक्ष करून या सरकारानें संस्थान खालसा केलें होतें. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष काय तों विलायतेंत व्हावयाचा होता, व तिकड़े सर्व लोकांचे डोळे लागले होते. परंतु विलायतेंत हें काम आठ नऊ वर्षे झालीं तरी निकालास निघेना ! एका अर्थी हा खोळंबा फायद्याचाच झाला. कंपनीसरकारचें राज्य होतें तोंपर्यंत राज्यकारभाराचें धोरण निराळे होते. मूळची चार बंदरांत वखारी घालून बेपार करणारी