त्यांस ती उत्तम संधि सांपडली. नारो महादेव यांजवर त्यांचा पूर्ण विश्वास आतां बसला असल्यामुळें आपल्या दौलतीचा सर्व कारभार त्यांनीं त्यांजकडे सोंपविला होता. राजाराममहाराजांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राचे स्वातंत्र्य राखण्याकरितां संताजीरावांनी जे असाधारण पराक्रम केले आहेत त्यांच्यायोगानें त्यांचें नांव इतिहासांत अजरामर झालें आहे. त्या पराक्रमांची विशेष विस्तारानें लिहिलेली हकीकत डफ् साहेबांच्या इतिहासांत व छत्रपति राजाराममहाराज यांच्या बखरींत लिहिलेली आहे. तिचा संक्षेप खालीं लिहिल्याप्रमाणे:-
सन १६९० त मोंगलांच्या फौजा महाराष्ट्रांतील किल्ल्यांस वेढा घालून बसूं लागल्या. कित्येक किल्ले त्यांनीं काबीजही केले. त्यांपुढें आपला निभाव लागत नाहीसें पाहून राजाराममहाराज गुप्तरूपें कर्नाटकांत चंदीचंदावरास गेले. त्यांबरोबर जे धुरंधर मुत्सद्दी व सरदार तिकडे गेले त्यांत संताजीरावहीं होते. हा प्रवास फारच धोक्याचा होता व त्यांत एका प्रसंगीं महाराजांचा जीव बचावण्याकरितां संतांजीरावांचे बंधु मालोजीराव यांस आपल्या प्राणाची आहुति द्यावी लागली असेंही एके ठिकाणीं लिहिलें आहे. चंदीस गेल्यावर महाराजांनीं संताजीरावांस सेनापतीचे पद दिले व जरीपटका व नौबत दिली. याच प्रसंगी त्यांस त्या महाराजांनीं “हिंदुराव ममलकतमदार" असा किताब दिल्याचे डफ् साहेब लिहितात. पण वस्तुतः संताजीराव वगैर त्रिवर्गबंधूंच्या घराण्यांत तीन निरनिराळे किताब आहेत. हे प्राचीनकाळापासून चालत आलेले किताब या वेळीं त्या त्रिवर्ग घोरपडे घराण्यांनीं निराळे वांटून घेतले असतील व त्यांच्या इच्छेप्रमाणे राजाराममहाराजांनी ते तिघांकडे तीन कायम केले असतील. तें किताब संताजीरावांच्या घराण्याकडे " ममलकतमदार ", बहिरजीराव