Jump to content

पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१८६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १७६ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

बानीं कोल्हापूरकर महाराजांची ताबेदारी मान्य केली. त्यासंबंधें ता.१३ नोवेंबरं स० १८४७ रोजीं तात्यासाहेब व इंग्रजसरकार यांमध्यें पांच कलमांची यादी ठरली तींतला अभिप्राय वर दर्शविलाच आहे.
 स.१७२४ त थोरले व्यंकटराव नारायण करवीरच्या राजमंडळांतून फुटून सातारा राजमंडळांत प्रविष्ट झाले, आणि त्यांचे निपणतू केशवराव नारायण स.१८४७ त पुन्हा करवीरच्या राजमंडळांत आकृष्ट झाले ! मध्यंतरींच्या सवाशें वर्षांच्या इतिहासांत जेथें जेथें कोल्हापूर व इचलकरंजी या संस्थानांचा संबंध येई तेथें तेथें कोणत्याना कोणत्या तरी रूपानें हें 'इलाखाप्रकरण' डोकावून पहात असे ! इंग्रजसरकारानें या त्रासदायक प्रकरणाचा एकदां कसाबसा निकाल लावून टाकिला !
 यानंतर केशवराव तात्यासाहेब फार वर्षे जगले नाहींत. भाद्रपद वद्य ९ शके १७७४ ता. ७ आक्टोबर स.१८५२ रोजीं त्यांचें देहावसान झालें.त्यांस दोन स्त्रिया होत्या. पहिली प्रसिद्ध बाळाजीपंत नातू यांची कन्या लक्ष्मीबाई. ती वारल्यावर दुसरें लग्न मोरोपंत दांडेकर यांच्या कन्येशीं झालें. तिचें नांव यशोदाबाई. या दुसऱ्या स्त्रीपासून त्यांस स० १८५० त एक पुत्र झाला होता तो पांच सात महिन्यांचा होऊन वारला. याखेरीज त्यांस संतान झालें नाही.
 पेशवाई गेल्यावर इंग्रजसरकाराचें राज्य सुरू झालें तेव्हां त्या सरकारानें मेहेरबानी करून सर्व जहागीरदारांस त्यांच्या त्यांच्या जहागिरी व संस्थानें बहाल केलीं व पेशवेसरकारांत त्यांस चाकरी करावी लागे ती बहुतांशीं माफ केली. इंग्रजी राज्याचा नवीन देखावा पाहून त्या वेळचे जहागीरदार व संस्थानिक भांबावून गेले. इंग्रज लोकांची भाषा, स्वभाव व राज्य करण्याच्या पद्धति अगदींच माहीत नसल्यामुळें त्या लोकांशीं जहागीरदारांची वागणूक सभय व साशंक चित्तवृत्तीनें