पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१८१

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(१७१)
तिसरे व्यंकटराव नारायण.

आजरें तालुक्याच्या ३१ खेड्यांची सनद यांपासून आम्ही घेतली आहे ती केवळ यानीं विनाकारण उपद्रव न द्यावा एवढयाचकरितां घेतलेली आहे. यांच्या सनदेनेंच त्या खेड्यांवर आमचे स्वत्व उत्पन्न झालें असें कांहीं नाहीं. यांची सनद घेण्यापूर्वी सात वर्षे तो सबंध आजरें तालुका आम्हास शाहूमहाराजांनी इनाम करून दिलेला आहे व त्या सनदेवरच आमचा भोगवटा अव्याहत चालू आहे. हे भांडखोर उपद्व्यापी शेजारी असल्यामुळें यांच्या संतोषाकरितां ३१ खेड्यांची सनद आम्हीं यापासून घेतली. ती शास्त्रार्थाकरितां घेतलेली सनद यांचे आम्ही ताबेदार म्हणण्यास कशी पुरेशी होईल? शिवाय यांचें इनाम थोडें आणि ताबेदारीचा कधीं दाखला नाहीं, आणि सातारकरांचें इनाम अधिक, व त्यांची व पेशवेसरकारची आम्हांवर ताबेदारी जवळजवळ शंभर वर्षे आहे; त्या अर्थी त्यांच्या जागीं असलेल्या इंग्रजसरकाराचाच आम्हांवर ताबा असणें वाजवी आहे. देशमुखी वतनाबद्दल हे म्हणत असतील, तर मूळ वतन आम्हांस शाहूमहाराजानीं दिले तेव्हांपासून या वतनाबद्दल आम्हीं कधीं कोणाची चाकरी केलेली नाहीं व कोणास नजरही दिलेली नाहीं. आमच्या वडिलांनीं राज्यरक्षणाच्या कामीं श्रमसाहस केलें व आम्ही पेशव्यांचे आप्तसंबंधी. इकडे नजर देऊन शाहूमहाराजानी मिरज प्रांतीचे वतन याप्रमाणें नजर अथवा चाकरी न घेतां आम्हांकडे चालविलें व त्याप्रमाणें पन्हाळा प्रांतींचें वतनही करवीकरांकडून चालविले. अलीकडे करवीरकरांनी आम्हांवर जबरी करून आमची फौज एकदां चाकरीस नेली व दोन तीन वेळां नजर घेतली व दरसाल साडेबाराशें रुपये देण्याचा करारही लिहून घेतला हे खरे, पण एवढ्यावरून त्यांची आम्हीं चाकरी करावीं अथवा त्यांच्या ताब्यांत वागावें असें कांहीं सिद्ध होत नाहीं! कारण प्राण वांचविण्याकरितां माणूस पाहिजे तें कबूल करितें. ते प्रमाण म्हणून कोणी समजत नाहीं!