केली व त्यास नेहमीं आपल्या दिमतीस ठेविलें. नारोपंतांची मुंजहीं त्यांनींच करविली व ते अंमळ मोठे झाल्यावर त्यांचें लग्नही करून दिलें. नारोपंतांच्या स्त्रीचें नांव लक्ष्मीबाई असें होतें. नारोपंत विद्या शिकून तयार झाले तेव्हां संताजीरावांनीं त्यांस प्रथम लहानसहान कामें सांगून पायरीपायरीनें वाढवीत शेवटीं आपल्या पागेच्या मुजुमदारीचें काम सांगितलें. तें जबाबदारीचे काम नारोपंत मन लावून करीत असत. त्यांची संताजीरावांवर प्रीति व भक्ति निस्सीम होती. त्यामुळें संताजीरावांचाही त्यांजवर दिवसेंदिवस अधिक विश्वास बसत चालला. काम जोखमीचें असो कीं हलकें असो, तें नारोपंतांवर सोपविलें असतां उत्कृष्ट रीतीने बनून यावें, असें नेहमीं होऊं लागलें.
नारोपंतांच्या वयास अठरा वर्षे होतात तों शिवाजीमहाराज मृत्यु पावले. त्या पुढलीं नऊ वर्षे संभाजीमहाराजांची कारकीर्द. या कारकिर्दीतसुद्धां संताजीरावांच्या पथकास बरीच चाकरी पडली व कांहीं स्वाऱ्या व लढायाही कराव्या लागल्या. संताजीरावांबरोबर नारोपंत प्रत्येक स्वारींत हजर रहात असल्यामुळें त्यांस लष्करी कामाचा अनुभव येत चालला. संभाजीमहाराजांस औरंगजेबानें मारून टाकिल्यावर राजाराममहाराज गादीवर बसले व त्यांनीं सन १६९१ त संताजीरावास सेनापतीचा अधिकार दिला हें मागें सांगितलेंच आहे.
सेनापतीचा अधिकार मिळाल्या दिवसापासून संताजीरावांच्या अचाट पराक्रमांची परंपरा सुरू झाली. तो काळ विलक्षण धामधुमीचा होता. त्यामुळें आपल्या अंगचा पराक्रम व कर्तृत्व प्रकट करण्यास
१. गंगाबाई नारोपंतास घेऊन घांट चढून आली तेव्हां थकून एका झाडाखालीं बसली असतां संताजीराव शिकारीस आले होते त्यांची व तिची गांठ पडून व त्यांनीं तिची विचारपूस केली, व तिला आश्वासन देऊन नारोपंतास आपल्या दिमतीस घेतलें, असेंही कोठें कोठें लिहिलें आहे.