पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१७७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(१६७)
तिसरे व्यंकटराव नारायण.

सरकाराशी लढाई करून परिणाम लागणार नाहीं हें त्यांस आतां कळून चुकलें.पण आतां लढाईच्या इराद्याने जमा केलेली फौज आपला तुंबलेला पगार मिळाल्याखेरीज घरोघर कशी परत जाते हीच त्यांस फिकीर पड़ली! या वेळीं तें इंग्रजी फौजेपेक्षा आपल्याच फौजेस अधिक भिऊं लागले!
 इचलकरंजी व कागल वगैरे संस्थानांसंबंधानें महाराजांची जीं अद्वातद्वा बोलणीं होतीं तीं इंग्रजसरकार मान्य करील अशी त्यांस अजून सुद्धां आशा वाटत होती! सरकार आपल्या मागण्या कबूल न करील तर आपण काशीस जातों, इंग्रजसरकारानें आपल्या राज्याची पाहिजे तशी व्यवस्था करावी, असेंही महाराजांनी साहेबमहसूफ यांशीं बोलून पाहिंलें. परंतु या खेपेस महाराजांस पुरती तंबी देऊन त्यांचा पक्का बंदोबस्त करावा असा सरकारचा इरादा ठरलेला असल्यामुळें निसबेटसाहेबांनी महाराजांचें कांही एक म्हणणें न ऐकतां करवीरावर चाल केली. तेव्हां शहरचे दरवाजे आपोआप मोकळे होऊन करवीर शहर इंग्रजी फौजेच्या ताब्यांत अनायासानें आलें. शहरांत शिरतांच निसबेटसाहेबांनी प्रत्येक वेशीस पंचवीस व प्रत्येक बुरुजास दहा व राजवाड्याभोंवतीं दोनशें याप्रमाणें संत्री पहाऱ्याकरितां उभे केले, व शहरांत चोहींकडे नाकेबंदी केली. आणि राज्यांतलीं अकीवाट, भूधरगड, सामानगड, पन्हाळा व पावनगड हीं स्थळें तत्काळ लोक पाठवून ताब्यांत घेतलीं. महाराजांचा ४००० पायदळ व २००० स्वार असा जमाव कोल्हापूर शहरांत होता, परंतु लढाईची मसलत विरघळून गेल्यामुळें इंग्रजी फौजेशीं कटकट न करितां अथवा पगाराबद्दल महाराजांस उपसर्ग न देतां हे सर्व लोक शहर सोडून खेड्यापाड्यांनीं निघून गेले. महाराज व त्यांचे मानकरी यांस तीन दिवस राजवाड्यांत कोंडून ठेवण्यात आले होते.