इचलकरंजी संस्थान खालसा करण्याचा अधिकार आपणास नाही असें इंग्रजसरकार म्हणतें, तर तो अधिकार आपण मनगटाच्या जोरावर स्थापित करावा, असें बुवासाहेबमहाराजानीं मनांत आणिलें! आदल्या वर्षीच्या तहांत इचलकरंजीकर व कागलकर यांस आपण उपद्रव देणार नाहीं असें महाराजानीं लिहून दिलें असतांही त्या संस्थानांस सतावून सोडण्याचा त्यानीं संकल्प केला, व त्याप्रमाणें इंग्रजसरकार नको नको म्हणत असतांही स्वार, पायदळ, व तोफा वगैरे पोक्त सामान तयार करून बुवासाहेबमहाराज स्वारीस निघाले! महापुराचें पाणी आलें म्हणजें जसें तें नदीच्या पात्राबाहेंर पडून चोहोंकडे पसरून नासधूस करितें त्याप्रमाणे महाराजानीं जमविलेल्या १०००० प्यादे व ४००० स्वार अशा या प्रचंड जमावाची स्थिति होती. या फौजेनें कागलकर व भाऊमहाराज यांच्या गांवांत ठाणीं बसविलीं, व चिंचणीकर पटवर्धन यांचे भोज, एकसंबे वगैरे गांव घेऊन लुटले. नंतर स्वारीचा मुख्य उद्देश इचलकरंजी संस्थान काबीज करण्याचा होता त्यास अनुसरून निमी फौज घेऊन खुद्द महाराज इचलकरंजीवर चालून आले. व निम्मी फौज आजऱ्यांकडे रवाना झाली. आजऱ्यांकडे गेलेल्या फौजेनें मतिवडें, अर्जुनी, शिपूर,मडिलगें, खेड, भादवण या गांवांत ठाणीं घातलीं व लुटालूट करून फार खराबी केली. इचलकरंजीकडे आलेल्या फौजेने शिरढोण, लाट, रांगोळी व शिर्दवाड ही ठाणीं घेतली. तोफखान्यासुद्धां हें पांचहजार सैन्य शिरढोण व टाकवडें येथें उतरलें होतें. हें सैन्य दररोज इचलकरंजीवर चालून येई तेव्हां उभयपक्षी झटापटी होऊन कांहीं माणसें जायांजखमी होत.आजरें व इचलकरंजी या दोन ठाण्यांखेरीज महाराजानीं आतां सर्व संस्थान घेतलें होतें व इचलकरंजी काबीज करण्याचा त्यांचा पक्का निश्चय दिसून येत होता.
पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१७५
Appearance