मिरजमळा संस्थान कर्जांतून मोकळें करून भरभराटीस आणिल्याबद्दल त्या बाईंचा दक्षिण महाराष्ट्रांत मोठा लौकिक झालेला आहे.
बाबासाहेब हे पराक्रमी, दृढनिश्चयी, व धोरणी सरदार होते. ते ज्या काळांत जन्मास आले तो काळ यांच्या सदुणांचा परिपोष होण्यास अनुकूल नव्हता. तथापि विपत्तीच्या स्थितींतही आपल्या कर्तवगारीची पराकाष्ठा करून त्यानीं अनेक दुर्धर संकटांतून इचलकरंजी संस्थानाचे रक्षण केलें ही गोष्ट सर्वसंमत आहे.
बाबासाहेब वारल्यानंतर त्यांचे थोरले पुत्र व्यंकटराव रावसाहेब हे संस्थानच्या गादीचे मालक झाले. या गोष्टीस इंग्रजसरकाराकडून कांहीं अडथळा आला नाही, परंतु करवीरकर बुवासाहेवमहाराज यानीं इंग्रजसरकारास थैली लिहिली कीं, इचलकरंजी संस्थान हें आपल्या ताब्यांतलें असल्यामुळे बाबासाहेबांमागें यांच्या मुलांकडे संस्थान चालवावें कीं खालसा करावें, हे ठरविण्याचा अधिकार आमचा आहे व हें संस्थान बाबासाहेबांच्या मुलांकडे न चालवितां करवीरसरकारांत खालसा करावे असा आपला मनोदय आहे. ही थैली गेल्यावर सरकाराने दप्तरचे दाखले पेशवाई कारकीर्दीपासूनचे काढवून चौकशी केली आणि बुवासाहेबमहाराजांस कळविलें कीं,इचलकरंजी संस्थान खालसा करण्याचा तुम्हांस अधिकार नाही.