पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१७०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(१६०)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास

इचलकरंजीकरांस चाकरीची व नजरेची माफी दिली होती. इतकेंच नाहीं, तर पन्हाळा प्रांतींच्या देशमुखीबद्दल करवीरकरमहाराजांकडूनही माफ देंवविली होती. ज्यानीं माफी दिली व देवविली ते शाहूमहाराज मराठी साम्राज्याचे सार्वभौम असल्यामुळे त्यांस तसें करण्याचा अधिकार होता. तीच माफी पेशव्यानीं पुढें चालू ठेविली इतकेंच. त्यांत नवीन असें त्यांनीं कांहींच केलें नाही. महाराजांच्या वेळेस जसे ज्यांचे हक्क होते तशा त्या हक्कांची मिरासदारी त्या त्या लोकांकडे चालविण्यास पेशवेसरकार बांधलें गेलें होतें. बाजीरावसाहेब गादीवर बसल्यापासून दंग्याधोप्यामुळे पेशवाईचे बळ कमी झालें. ती संधि साधून करवीरच्या महाराजानीं गेल्या वीस बेवीस वर्षांत इचलकरंजीकरांचे वतन जप्त करावें व नजरेबद्दल जबर रक्कम घेऊन सोडून द्यावें, असें पांच चार वेळां केले. हल्ली सुद्धां हें वतन जप्तींतच होतें. ते सोडण्याबद्दल पेशव्यांप्रमाणे इंग्रजसरकारनें महाराजांस तगादा करावा अशी बाबासाहेबांची अपेक्षा होती, परंतु महाराजांस कांहीं तरी देऊन त्यांची समजूत केल्याशिवाय इंग्रजसरकार या कामांत मन घालीत नाहीं असें त्यांस लवकरच दिसून आलें! तेव्हां निरुपाय झाल्यामुळें बाबासाहेबानीं भाऊमहाराजांमार्फत करवीरच्या महाराजांशी करार केला कीं, महाराजानीं चाकरीचा अगर दुसरा हरएक उपसर्ग न लावतां आपलें वतन आपणाकडे पूर्वपद्धतीप्रमाणें चालवावें व आपण त्यांस दरसाल फक्त साडेबाराशें रुपये द्यावे. हा करार ता. १९ सप्टेंबर सन १८२० दिवशीं झाला.
 करार होऊन थोडे दिवस लोटतात तों पुन्हां कांहीं क्षुल्लक कारणावरून कटकट होऊन महाराजानीं देशमुखी मोकळी करण्याचें मना केलें व इचलकरंजीवर थोडीशी फौज रवाना केली. या फौजेनें येऊन इचलकरंजीस फार उपद्रव दिला. तिचें पारिपत्य करण्याचें