Jump to content

पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१६६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १५६ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

पडली नाहीं. इचलकरंजी संस्थानाची मात्र दैना यांच्याइतकी कोणी कधींच केंली नाहीं ! जणुं काय, मागच्या गोष्टींबद्दल त्यांस इचलकरंजीकरांवर सूड उगवावयाचा होता इतकेंच नव्हे, तर पेशवे व पटवर्धन यांवरच्या रागाचें उट्टे सुद्धां त्यांवरच काढावयाचें होतें !
 यापुढच्या तीन चार वर्षात अल्पिष्टनसाहेबांच्या उद्योगामुळें दक्षिण महाराष्ट्रांतील संस्थानिक व सरदार यांमधले तंटे मोडून बराच बंदोबस्त झाला. पंढरपूरच्या तहामुळें पटवर्धनांच्या जहागिरीस सुरक्षितपणा आला व त्यांचें समाधान होऊन ते पेशव्यांची हुकमत मानण्यास तयार झाले. निपाणकरानें नरमपणा धरिला व करवीरकरांचा दंगाधोपा कांहीं कमी झाला. पण इचलकरंजी संस्थानापैकीं कांहीं गांव करवीरकरानीं घेतले होते व देशमुखी वतन जप्त केलें होतें त्याबद्दल बाबासाहेबांनी अनेक वेळां तकरार केली असतांही अल्पिष्टनसाहेब अगर पुणेंं दरबार यांतून एकानेंही त्यांची दाद घेतली नाहीं !
 इंग्रजी राज्य सुरू झाल्यापासून देशांतले दंगेधोपे मोडले. संस्थानिक व राजेरजवाडे यांमध्यें लढे उत्पन्न झाल्यास एकदम परस्परांनीं हातघाईवर येऊन लढाई सुरू करण्याचा प्रघात पडला होता तो बंद झाला.'एकमेकांविरुद्ध काय तकरारी असतील त्या या आमच्या नजरेस आणाव्या, आम्ही त्यांचा वाजवी दिसेल त्याप्रमाणें न्याय करूं; कोणी खटला वाढवून लढाई करील तर त्यावर सरकारची इतराजी होईल;' असे अल्पिष्टनसाहेबानीं सर्व सरदारांस निक्षून बजाविलें होतें. करवीरकरांविरुद्ध इंग्रजसरकारांत फिर्याद नेण्याचा प्रसंग बाबासाहेबांस लवकरच आला ! कारण कीं, सन १८१९ त करवीरकरानीं आजरें प्रांतीं दंगा करून कित्येक खेड्यांत लुटालूट व जाळपोळ करून तेथील रहिवासी सामानगड व भूदरगड़ येथें नेऊन अटकेंत