Jump to content

पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१६५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १५५ )
दुसरे नारायणराव व्यंकटेश

येऊन तालुके व गांवखेडीं ज्यांची त्यास देण्यास तयार झाला! इचलकरंजीकरांचीं खेडीं त्यांस परत मिळावयाचीं तीं पेशव्यांच्या मार्फत न मिळतां आपले मार्फत मिळावीं, कारण ते पेशव्यांचे सरदार नसून आपले सरदार आहेत, असें करवीरकरांचे म्हणणे होतें हें पूर्वी सांगितलेंच आहे. तें बोलणें अल्पिष्टनसाहेबांस पटलें नाही. पेशव्यांनींच निपाणकरापासून गांव घेऊन इचलकरंजीकरांस द्यावे असें या साहेबांंनीं ठरवून त्याप्रमाणें अमलांत आणविलें.
 सन १८१३ त करवीरकर शिवाजीमहाराज मृत्यु पावले.त्यांस संभाजीमहाराज व शाहूमहाराज व असे दोन पुत्र होते.त्यांपैकीं थोरले पुत्र संभाजीमहाराज हे गादीवर बसले. शिवाजीमहाराज हे जात्या थोर मनाचे दयाळू,शूर व कारस्थानी होते. शिपाईगिरीचे ते मोठे चहाते असल्यामुळें जातिवंत मराठ्यांची हजार पांचशें घराणी त्यांच्या आश्रयास येऊन राहिली होतीं व या सर्वांचें ते यथाशक्ति संगोपन करीत असत. यांची सर्व कारकीर्द धामधुमीची झाल्यामुळें तीपासून रयतेस अवर्णनीय पीडा झाली, याला मुख्य कारण त्यांनीं मुळांपासून भलतेंच राजकीय धोरण' धरिलें व मागचीं वैरें उगविण्याचा हव्यास धरिला, हे होय. अशा या त्यांच्या बंडाळीच्या कारकीर्दीतही एक प्रकारचे तेज होतें व याला सर्वस्वी कारण त्यांचा स्वतःचा पराक्रम होता ! सातारच्या थोरल्या शाहूमहाराज प्रमाणें ते कारभाऱ्यांवर कामें सोंपवून चैनींत घरीं बसलें असें कधीच झालें नाहीं. प्रत्येक मसलतींत, प्रत्येक लढाईत, ते सुखाची अगर जिवाची सुद्धां पर्वा न बाळगतां पुढाकार घेत असत, यामुळें यांच्या फौजेत उत्साह, अभिमान व शौर्य हीं जागृत होतीं, आणि जिवास जीव देणाऱ्या शिपायांचं व विश्वासू मुत्सद्यांची त्यांस कधीं वाण