पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१६२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १५२ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास

वीरकरांनीं व निपाणकरानीं आपले गांव घेतले आहेत ते त्यांजकडून आपणास परत देववावे म्हणून इचलकरंजीकर हे पेशवे व इंग्रज यांस तगादा करीत होते. आपलें देशमुखीचें वतन सोडावें म्हणून पेशव्यांजवळ त्यांचे बोलणें स्वतंत्रपणें चाललेंच होतें. करवीरकरांचे आरमार इंग्रज व्यापाऱ्यांचीं गलबते लुटीत असे, म्हणून इंग्रजांस फार राग आला होता; व फौज पाठवून करवीरकरांस तंबी द्यावयाचा त्यांचा विचार होता.कोणाचा पायपोस कोणाच्या पायांत नाही अशी स्थिति झाली होती ! पुण्यास इंग्रजांचा वकील होता त्यानें सर्वाशीं सामोपचारानें बाेलून व कांहीं भयप्रदर्शन करून या तंटेभांडणांचा आपापसांत निकाल झाला तर पहावा अशी योजना केली होती, या प्रसंगी इचलकरंजीकर, निपाणकर व करवीरकर या तिघांचे वकील पुण्यास आपापल्या बाजूचें समर्थन करण्यास हजर होते. इचलकरंजीहून लक्ष्मण मल्हार या नांवाचा कारकून वकिलीस गेला होता त्याचीं पत्रें या पुस्तकांत छापिलीं आहेत तीं महत्वाचीं आहेत.करवीरकरांच्या वकिलाचे इंग्रजांशी बोलणे झालें कीं, “इचलकरंजीकर व शितोळे व सेनापति व नेरलीकर हे सर्व आपल्या तर्फेचे त्यांची गांवखेडीं व झाडून दुमालदार यांचीं सोडचिठ्या देऊन आपले स्वाधीन करावीं.आम्ही ज्यांचीं त्यांस द्यावयाचीं असतील तशीं देऊ. त्यावर इचलकरंजीकरांपुरता पेशव्यानीं जबाब दिला कीं, “पहिल्यापासून सरकार लक्षानें वागत गेले व चाकरी सरकारांत, त्यापेक्षां त्यांची गांवखेडीं आम्ही त्यांचे हवालीं करूं" याप्रमाणें उभय पक्षांचे बोलणे इंग्रज सरकाराचे वकील मि० एल्फिन्स्टन् ( यांस आपले लोक ’ अल्पिष्टन् साहेब' म्हणतात.) यांजकडे लागले होते. इचलकरंजीकरांच्या वकिलास कोल्हापूरकरांच्या वकिलानीं सांगितलें कीं, तुम्ही इंग्रजांशी आमचे मार्फतीनें बोलावें.