पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१५३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(१४३ )
दुसरे नारायणराव व्यंकटेश.

होऊन वतन त्यांजकडे राहिलें. आपणा एकटयांस वाद सांगणें निभावत नाहीं असें पाहून जैनांनीं अर्धे वतन कित्येक ब्राह्मणांस देऊं करून त्यांस आपले भागीदार केलें होते. परंतु आजपर्यंत मिरज प्रांताच्या देशमुखी सरदेशमुखीचें वतन हस्तगत होण्याच्या कामीं जैन व ब्राह्मण या दोघांचाही यत्न सफल झाला नाहीं. हल्लींच्या या धामधुमींत आपला हेतु सिद्धीस जाईल असें वाटल्यामुळे जैन व ब्राह्मण मोठया नेटानें वादास उभे राहिले. प्रथम सन १७९७ च च्या प्रारंभीं त्यांनी बाजीराव पेशव्यांचे बंधू अमृतराव यांजकडे फिर्याद नेली. अमृतरावांनीं ते प्रकरण चौकशीसाठी नाना फडनविसांकडे पाठविलें.पुढें पुणें दरबारांत अमृतरावाचें तेज कमी होऊन सर्जेराव घाटग्यांचा बोलबाला झाला व घाटग्यांकडे तें पाहून जैन ब्राह्मण यांनीं घाटग्यांकडे धाव मारिली. त्यांस असल्या उलाढाली करण्याची मोठीच हौस असल्यामूळें त्यांनी फिर्याद घेऊन त्या काळच्या वहिवाटीप्रमाणें वादाचा निर्णय हाेई तेथपर्यंत प्रांत मिरज येथील देशमुखी सरदेशमुखीचें वतन सरकारांतून जप्त करविले. ही जप्ती उठविण्याविषयी खटपट करण्याकरितां पुण्यास कृष्णाजी अनंत मायदेव या नांवाचा कारकून बाबासाहेबांनी पाठविला. त्या कारकुनानें बाळोजी कुंजर, सर्जेराव घाटगे, व अमृतराव यांजकडे येर-झारा घालघालून त्यांच्या घरांचे उंबरठे झिजविले; पण त्या वेळी पुणे दरबारांत खुद्द पेशव्यांपासून तों यःकश्चित् मनुष्यापर्यंत सर्वच लोक हलक्यासलक्या कामाकरितांसुद्धां पैका मागणार; त्यांत ही तर वतनी बाब ! मुबलक पैका देऊन सर्व दरबारी लोकांचीं तोंडें बांधावीं तेव्हां कार्य होण्याची कांहीं आशा ! पण बाबासाहेबांस द्रव्य देण्याची ऐपत नसल्यामुळें हें वतनी वादाचे घोंगडें तसेंच भिजत पडलें. त्यांचा कारकून मोठा खटपटी मनुष्य होता. इकडून तिकडे वशिल लावावा,तिकडून इकडे चिठी आणावी, कोणास कांहीं देऊं करावें, कोणाचीं