Jump to content

पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१५०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १४० )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

सोडून बाळोबातात्यांस मिळाले. मग या दोघांनीं बाजीरावांस पद्च्युत करून त्यांचे धाकटे बंधू चिमाजी आपा यांस यशोदाबाईंच्या मांडीवर बसविलें व त्यांचें नांव चिमणाजी माधवराव असें ठेऊन त्यांच्या नांवाने साताऱ्याहून पेशवाईचीं वस्त्रे आणविलीं. नंतर ते नानांस धरण्याचा यत्न करूं लागले तेव्हां नाना साताऱ्याहून महाडास पळून गेले.तेथून नानाप्रकारच्या मसलती लढवून त्यांनीं बाजीरावांस गादीवर बसविण्यासाठीं शिंदे, होळकर, भोंसले, निजामअल्ली आणि इंग्रज यांस अनुकूल करून घेतलें. नंतर शिंद्यांनीं आपले कारभारी बाळोबातात्या यांस कैद केलें. ते पहातांच परशुरामभाऊ चिमाजीआपांस घेऊन जुन्नराकडे पळून गेले. परंतु शिंद्यांनीं व नानांनीं फौज पाठवून पाठलाग करून चिमाजआपांस परत आणिलें व भाऊंस धरून मांडवगणच्या किल्ल्यावर कैदेंत टाकिलें. नंतर नाना फडनवीस पुण्यास येऊन पूर्ववत् करभार करू लागले व बाजीरावांची पेशवाईच्या गादीवर स्थापना झाली. शिंद्यांस अनुकूल करून घेण्यासाठीं नानांनीं जीं माणसें योजिलीं होतीं त्यांत सर्जेराव घाटगे कागलकर हे होते. त्यांची मुलगी बायजाबाई म्हणून होती ती त्यांनी पुढे लवकरच दौलतराव शिंद्यांस दिली व बाजीरावांस अनुकूल करून घेऊन शिंद्यांच्या दौलतीचा सर्व कारभार अापणाकडे करून घेतला.
 परशुरामभाऊंचें व नानांचें वांकडे आल्यावर नानांनीं पटवर्धनांच्या जहागिरीवर स्वारी करण्याविषयीं कोल्हापूरकरांस चिथावून दिलें. पुणें दरबाराची घालमेल पाहून कोल्हापूरकरांनीं धामधूम करण्याचा बेत योजिलाच होता, त्यांत नाना फडनविसांकडून हा इषारा मिळाला, आणि परशुरामभाऊ कैदेंत पडले, असें पहातांच फौजेचा जमाव करून ते स्वारीस निघाले, इचलकरंजीचें संस्थान आजपर्यंत टिकलें तें केवळ पुणें दरबाराच्या व पटवर्धनांच्या जोरावर होय.