पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१४८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १३८ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

एकसारखी सुरू होती. त्यांजपासून नजराण्याबद्दल जबर रक्कम घेऊन मग त्यांस संस्थान द्यावें, हा नाना फडनविसांचा हेका होता. संस्थान किती नातवानीस आलें आहे याबद्दल बाबासाहेबांनीं व त्यांच्या कारभाऱ्यांनी वारंवार पेशव्यांजवळ व नानांजवळ विनंती केली तरी नानांनीं आपला हेका सोडिला नाहीं. उभयपक्षीं घासघीस होतां होतां कराराची यादी एकदांची ठरून तिजवर पेशव्यांची मखलाशी झाली. सरंजामाचे व इनामाचे गांव व देशमुखी सरदेशमुखी मिळून संस्थानचें उत्पन्न सारें सत्तर हजार रुपयांचें होतें, व हें संस्थान बाबसाहेबांच्या हवालीं करण्याबद्दल सरकारचा नजराणा २००००० रुपये व दरबार खर्च ५६००० रुपये पुणें दरबाराकडून मागण्यांत आले ! बाबासाहेबांनीं कर्ज काढून ही रक्कम सरकारांत भरली व इचलकरंजी संस्थान आपणाकडे बहाल करून घेतलें. यादींत 'सातारच्या महाराजांकडून व पेशवे सरकारांतून मिळालेलें इनाम तुम्हांकडे चालेल इतकेंच केवळ नव्हे, तर करवीरकर वगैरेकडुन मिळालेलीं इनामें व उत्पन्नें तुम्हांकडे निर्वेधपणें चालतील,' असें पेशवेसरकारचें वचन होतें. कडलास, पापरी व बेडग वगैरे तैनातीचे गांव संस्थानाकडे चालत होते ते या वेळीं प्रत्यक्ष नव्हे, परंतु पर्यायानें पेशव्यांनी काढून घेतले. तो प्रकार असा कीं, कैलासवासी व्यंकटराव यांचे हातून ब्राह्मण्याविरुद्ध कर्म घडलें असतां त्याचे प्रायश्चित होण्यापूर्वीच ते मृत्यू पावले, अशी सबब लावून सरकारने असा ठराव केला कीं, बाबासाहेबांनीं दरसाल १२००० हजार रुपये खर्चाचें अन्नसत्र काशीमध्यें निरंतर ठेवावें. अन्नसत्राकडे त्यांजकडून ही रक्कम पोंचावयाची ती दरसाल सरकारमार्फत पोंचत जावी. ही रक्कम इचलकरंजीकरांकडून वेळच्यावेळीं पोंचती न होईल तर सरकरानें इचलकरंजी संस्थानचे दरसाल १५००० रुपये उत्पन्नाचे