पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१४२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(१३२)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

ती मसलत पक्की करण्याकरिता खासा निजामअल्ली यांच्या व नाना फडणवीस, हरिपंत फडके व परशुरामभाऊ यांच्या यादगिरी येथें सन १७८४ त भेटी झाल्या. नानांबरोबर फौज होती तींत व्यंकटराव आपल्या पथकासह होते. पुढें टिपूवर स्वारी करण्याची मसलत उभयतां सरकारांत कायम होऊन पुढच्या वर्षी दोन्ही सरकारचीं सैन्यें टिपूनें घेतलेला मुलूख सोडविण्याकरितां निघाली. प्रथम स. १७८६ च्या सुरुवातीस त्यांनीं बदामीस वेढा घालून तो किल्ला घेतला. याही स्वारींत व्यंकटराव हजर होते. बदामीहून निजामअल्ली व नाना फडनवीस परत फिरले आणि हरिपंत फडके, तुकोजी होळकर, खंडोजी भोंसले नागपूरकर व मोंगलाकडील तहवारजंग इत्यादि सरदार ५०००० फौजेनिशीं टिपूवर गेले. बरेच दिवस युद्ध होऊन शेवटीं तह झाला व ती मोहीम समाप्त झाली.
 यापुढें व्यंकटरावांच्या सर्व स्वाऱ्या शिकाऱ्या बंद झाल्या. सरदारीचा त्यांस कंटाळा आला. पूर्वीपासून वेश्यांचा नाद त्यांस होताच. त्यांत आतां वाममार्गामुळें मद्यपानाचीही भर पडली ! यासंबंधे दिवसेंदिवस त्यांचा दुर्लौकिक होऊं लागला. धारवाडचा सुभा टिपूनें घेतल्यामुळें त्यांची मामलत बुडाली. दुसऱ्या कित्येक मामलती व सरंजाम वगैरे होते ते यापूर्वीच हातचे गेले होते. तोतयाच्या मसलतींत सवालक्ष रुपये भुर्दंड सरकारांत भरावा लागला, पांच लक्ष रुपये करवीरकरांच्या स्वाऱ्यांमुळें कर्ज झाले. अनूबाई हयात असून त्यांच्या धोरणानें राज्यकारभार चालता तर इतक्याही संकटांतून संस्थान कदाचित् बचावलें असतें. हे कर्ज फेडून संस्थान उजागरीस आणावें, पेशवे सरकारची कृपा संपादून मोठमोठ्या मसलती अंगावर घेऊन पार पाडाव्या, लाखो रुपये खंडणी मिळवावी व मुलूख संपादावा, इतका वकूब व्यंकटरावांच्या अंगीं आतां राहिला नव्हता. त्यांचा कारभार उधळपट्टीचा असे.