पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१४१

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १३१ )
दुसरे व्यंकटराव नारायण.

त्या काशीयात्रेसं गेल्या होत्या इतकी मात्र माहिती मिळते. परंतु त्या कधीं गेल्या होत्या तें साल समजलें नाहीं. त्यांस तुळापूर येथें देवाज्ञा झाली. इचलकरंजी संस्थानाच्या इतिहासांत विशेषेंकरून नांव घेण्यासारखी माणसें दोन. एक नारो महादेव व दुसऱ्या अनूबाई. अनूबाईंची कारकीर्द कसकशी झाली हें या पुस्तकांत सविस्तर सांगण्यांत आलें आहे. त्यावरून त्यांचा स्वभाव वगैरेची ओळख वाचकांस चांगली झालीच असेल. त्याविषयीं निराळें लिहिण्यास नको. अनूबाईनीं मोठमोठ्या मसलती अंगावर घेऊन पार पाडल्या. पुत्र व नातू नांवाला मात्र धनी होते, परंतु सर्व उद्योग अनूबाईच करीत असत. त्यांचा व्याप मोठा होता त्यामुळें त्यांस कर्जही झालें होतें. एका वेळीं तर त्या कर्जाचा अजमास १२ लक्ष रूपये होता ! पण बाईंस कर्ज होतें त्याप्रमाणें त्यांनीं संस्थानची जमाबंदीही वाढविली होती. त्यांची वागणूक नेमस्तपणाची असे व खर्चाच्या बारीकसारीक बाबींवर सुद्धा त्यांचें लक्ष असे. नानासाहेब पेशव्यांच्या कारकीर्दीत मुलूख वगैरे त्यानीं जितके मिळविले तितके पुढें त्यांच्या हातांत राहिले नाहींत. पण त्याचीं कारणें अन्य आहेत. त्यांत त्यांचा दोष कांहींएक नव्हता. तोतयाची मसलत मात्र त्यांच्या हातून फसली खरी.
 सन १७८२ मध्यें हैदरअल्ली मरण पावला. त्याचा मुलगा टिपू सुलतान पराक्रमी व क्रूर होता. त्यानें मोंगलांच्या व मराठयांच्या राज्यावर स्वाऱ्या केल्या, धारवाडचा सुभा सबंध घेतला, नरगुंद व कित्तूर हीं संस्थानें बुडविलीं, ब्राह्मण बाटविले, बायका भ्रष्ट केल्या, व दुसरे नाना प्रकारचे अनर्थ केले. त्यामुळें त्याचें शासन करण्याकरितां मोंगल व मराठे यानीं एकत्र व्हावें अशी मसलत पुणें व हैदराबाद येथील दरबारांत घाटू लागली.