पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१४०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १३० )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

त्याच्या पाठीस मराठ्यांचें सर्व सैन्य लागलें त्यामुळें तो मुंबईस पोंचेपर्यंत त्याचे शेंकडों लोक मारले गेले व कांहीं सामानसुमान लुटलें गेलें.
 इचलकरंजीकर हे यजमान व पटवर्धन हे त्यांचे आश्रित हा संबंध कायमचा असून ते परस्परांच्या हितास किती जपत असत हें यापूर्वी अनेकदां दाखविलेंच आहे. पटवर्धनांनीं एखादें धर्मकृत्य आरंभिलें तर त्याची पूर्तता करण्यास इचलकरंजीकरांनी प्रवृत्त व्हावें हे साहजिक होतें व तशी मदत घेण्यांत पटवर्धनांसही भूषण वाटत होतें. परशुरामभाऊनीं तासगांवास श्रीमहागणपतीचें देवालय बांधिलें तेव्हां तेथें नंदादीप, नैवेद्य, पूजासाहित्य व पुजाऱ्याचें वेतन हे खर्च चालविण्याकरितां व्यंकटरावांनी सन १७८१ | ८२ या वर्षी मिरज प्रांताच्या देशमुखी वतनापैकीं निरनिराळ्या गांवांतली मिळून ५० बिघे जमीन देवास इनाम दिली.
 व्यंकटरावांचें कुटुंब रमाबाई यांस समंधाची बाधा झाली होती. पुष्कळ उपाय झाले तरी ती बाधा दूर झाली नाहीं. गिरीस जाऊन त्यानीं व्यंकटेशाचीही बहुत सेवा केली, परंतु गुण आला नाहीं. नंतर त्या रामतीर्थ येथें जाऊन तेथील देवाच्या सेवेकरितां राहिल्या होत्या. पूर्वी कधींकाळीं इचलकरंजीकरांच्या हातून ब्रम्हहत्या झाल्याचा लोकापवाद होता. ज्याची हत्या झाली तो ब्राम्हण समंध होऊन रमाबाईच्या अंगांत येत असे अशी त्या वेळच्या लोकांची समजूत होती. अजूनही या समंधाची पीडा त्या घराण्यांतल्या मनुष्यांस होत असते अशी समजूत कायम आहे ! दर वर्षास या निमित्त कांहीं ब्राह्मणभोजनही होत असतें.
 या म्हणजे सन १७८३ सालीं अनूबाई मृत्यु पावल्या. तोतयाच्या मसलतीचा तो तसा परिणाम झाल्यावर अनूबाईनीं संस्थानाच्या कारभारांतून अंग काढून घेतलें होतें.