पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ४ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

पासून त्या टापूंत गजेंद्रगड येथें घोरपडयांचें ठाणें बसलें व त्यांपैकीं एका शाखेस ' गजेंद्रगडकर ' हें नांव पडलें. मुधोळकर घोरपड्यांस पूर्वी इदिलशाहींत कर्नाटकप्रांतीं जहागीर होती, परंतु ती त्यांच्या हातून गेल्यावर त्यांचा तिकडचा संबंध तुटला. त्यांनीं इनामें, वतनें, सरंजाम वगैरे काय मिळविलें तें महाराष्ट्रांतच मिळविलें. त्यामुळें त्यांची करामत महाराष्ट्रदेशांतल्या उलाढालींत मात्र दिसून आली. कृष्णातीरचे चव्हाण, थोरात वगैरे दुसरे सरदार होते त्यांचा कर्नाटकांत कधीं शिरकाव न झाल्यामुळें तेही दक्षिण महाराष्ट्रांतच सरंजाम वगैरे मिळवून राहिले. हे सारे ' महाराष्ट्रांतले सरदार ' म्हणून प्रसिद्ध आहेत. परंतु कापशीकर व त्यांचे अनुयायी इचलकरंजीकर यांची प्रसिद्ध ते ' कर्नाटकांतले सरदार ' म्हणून आहे. कापशीकर घोरपड्यांची पाटिलकीची वतने सातारा जिल्ह्यांत आहेत, पण त्यांनीं कृष्णेच्या उत्तरेस कधीं जहागीर मिळविण्याच यत्न केला नाही. प्रथमपासून त्यांचें वळण कर्नाटकाकडे पडत गेल्यामुळें तोच मुलूख त्यांच्या व त्यांचें अनुयायी इचलकरंजीकर यांच्या कर्तृत्वाचें क्षेत्र होऊन बसला.
 सन १६८९ त औरंगजेबानें संभाजीमहाराजांस धरून कैद केलें त्या वेळीं लढाई झाली तींत म्हाळोजी घोरपडे ठार झाले. बादशहाच्या फौजेचा छापा येण्यापूर्वीच संभाजीमहाराजांस सुरक्षित स्थळीं पोचवावें म्हणून बहिरजी घोरपडयांनीं यत्न केला, परंतु संभाजीमहाराजांच्या दुराग्रहापुढें त्यांचें कांही चाललें नाही, व ते महाराज वर सांगितल्याप्रमाणें धरले जाऊन त्यांस औरंगजेबानें ठार मारविलें. त्यानंतर त्यांचे धाकटे बंधु राजाराममहाराज गादीवर बसले. त्यांनीं सन १७९१ सालीं संताजी घोरपडे यांस सेनापतीचें पद दिलें.