पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१३६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(१२६)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

या स्वारींत त्यांस यश आलें नाहीं. शत्रूच्या सैन्याशीं सावशी येथें लढाई झाली तींत पटवर्धनांचा पराजय होऊन हजारों लोक मारले गेले व बहुत फौज लुटली गेली. त्या युद्धांत कोन्हेरराव ठार पडले व पांडुरंगराव जखमी होऊन शत्रूकडे पाडाव सांपडले. याप्रमाणें वाताहत झाल्याचें वर्तमान ऐकतांच परशुरामभाऊ व रघुनाथराव पटवर्धन जलदीजलदीनें धारवाडाकडे गेले. त्यांच्या कुमकेस पुण्याहून हरिपंत फडके गेले. सुमारें एक वर्षभर हैदराशीं युद्ध झाले परंतु त्यांत मराठ्यांस म्हणण्यासारखें यश आले नाही. याप्रमाणें पटवर्धन व फडके तिकडे गुंतलेले पहातांच कोल्हापूरकरानीं पुनः चोहींकडे दंगा केला. चिकोडी व मनोळी हे तालुके राखण्याकरितां रामचंद्र गणेश व बाजीपंत अण्णा हे सरदार फौजेसुद्धां राहिले होते. त्यांस परत बोलावून पेशव्यानीं महादजी शिंदे यांस सन १७७८ त कोल्हापूरच्या बंदोबस्ताकरितां पाठविलें. शिंद्यापुढें करवीरकरांचे कांहीं चालेना, तेव्हां पंधरा लक्ष रुपये देण्याचा करार करून त्यानीं समेट केला. या स्वारींत व्यंकटराव फौजेसह महादजी शिंद्याबरोबर होते. करवीरकरानीं लाट व रांगोळी या गांवांविषयीं आग्रह धरिला होता. परंतु पेशव्यांचें महादजी शिंद्यांस स्पष्टपणे लिहून आले होते की, "पेशंजीपासून दोन्ही गांव व्यंकटराव नारायण यांचे इनाम आहेत. त्यांस सरकारांतून तहपट करार करून पाठविला त्याप्रमाणें कोन्हेरराव त्रिंबक यांच्या विद्यमानें तह झाला आहे त्या बमोजीब दोन्ही गांव त्यांजकडे आहेत त्याप्रमाणे करार करणें. गांव, खेडीं, देशमुखी, सरदेशमुखी वगैरे जे वतनबाब करवीर तालुक्यांत असेल ते पुरातन चालत आल्याप्रमाणें चालावें या बमोजीब कलम तहांत करार करून घेणें." अनूबाईंच्या आग्रहावरून हरिपंत फडक्यानींही शिंद्याच्या लष्करांत पेशव्यांचे वकील महादाजीपंत गुरुजी म्हणून होते त्यांस या दोन गांवांबद्दल पत्रें लिहिलीं.