पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१३५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(१२५)
दुसरे व्यंकटराव नारायण.

नंतर व्यंकटराव वेंगुर्ल्याकडे येऊन तेथून कोल्हापुरास आले. त्यांस पकडण्याविषयीं परशुरामभाऊंस हुकुम आला होताच. परंतु ते आपण होऊन भाऊंच्या स्वाधीन झाले.
 तिकडे पुण्यास पुन्हा एकदां चौकशी होऊन तो तोतया लबाड आहे अशी सर्व लोकांची खात्री झाल्यावर सखारामबापू व नाना फडणवीस यांनीं त्याची शहरभर धिंड काढून त्यास डोक्यांत मेखसूं घालून मारविलें. त्या प्रसंगी त्या बंडांतल्या कित्येकांचा शिरच्छेद झाला व कित्येकांच्या पायांत बिड्या ठोकून त्यांस डोंगरी किल्ल्यांवर ठेवण्यांत आलें. जितके म्हणून तोतयास अनुकूल झालेले आढळले त्या सर्वांची घरेंदारें व मालमत्ता जप्त करण्यांत आली. इचलकरंजीकरांची देशमुखी, सरदेशमुखी व इनाम गांव व तैनातीचें गांव हें सर्व जप्त झालें. पुण्याहून या जप्तीकरितां लक्ष्मण व्यंकाजी नांवाचा कारकून मिरजेस येऊन बसला होता. परंतु ही जप्ती फार दिवस टिकली नाहीं. परशुरामभाऊ वगैरे पटवर्धन मंडळींनीं फार सक्तीची रदबदली केल्यावरून व अनूबाईंनींही प्रार्थना केल्यावरून नाना फडनविसानीं कृपा केली व व्यंकटरावांपासून सवा लक्ष रुपये गुन्हेगारी म्हणून घेऊन जप्ती उठविली. तोतयाशीं संसर्ग झाल्याबद्दल रामशास्त्री यानीं व्यंकटरावांस तीन चांद्रायणें म्हणजे सुवर्ण प्रत्याग्नायें १२०० रुपयांचें प्रायश्चित्त सांगितलें. ते प्रायश्चित्त सरकारी कारकुनाच्या गुजारतीनेंं कृष्णातीरीं टाकळी येथें व्यंकटरावानी घेतलें. तोतयाच्या पंक्तीस जेवणारे व त्याजकडे श्राद्धास क्षण घेणारे व प्रत्यक्ष किंवा परंपरेनें त्याचा ज्यांना म्हणून संसर्ग घडला होता अशा सर्व लोकांस सरकारांतून सक्तीनें प्रायश्चित्तें देण्यांत आलीं!
 पांडुरंगराव व कोन्हेरराव हैदरअल्लीच्या बंदोबस्ताकरितां धारवाडाकडे गेले होते हें मागें सांगितलेंच आहे.