लोकांचें मत असेंच होतें. पेशवे व त्यांचे कारभारी यांच्या दहशतीमुळें कोणी तसें स्पष्ट बोलून दाखवीत नसत इतकेंच!
तो तोतया रत्नागिरीस कैदेंत असतां वर सांगितलेला रामचंद्र
नाईक तेथें मामलेदार होता. त्यानें सन १७७६ व त्या तोतयास
कैदेंतून सोडून खूळ माजविलें. नंतर लवकरच त्या तोतयाजवळ पुष्कळ फौज जमली व त्यानें तळकोंकणचे व घांटबंधारीचे किल्ले ताब्यात घेण्याचा सपाटा चालविला. अनूबाईनीं त्या प्रसंगी तोतयास जाऊन मिळण्याविषयीं पटवर्धन मंडळीस बोध केला, परंतु परशुरामभाऊ व पांडुरंगराव व कुरुंदवाडकर मंडळी यांस हें ढोंग आहे हें पक्कें माहित होते म्हणून त्यांनीं बाईंचा उपदेश ऐकला नाही.एक भास्कर हरीचा पुत्र हरबा अण्णा मात्र तोतयाकडे गेला. पटवर्धनांनीं आपलें म्हणणें ऐकिलें नाहीं म्हणून अनूबाई स्वस्थ न बसतां त्यानीं व्यंकटरावदादाची तोतयाकडे रवानगी केली! करवीरच्या मोहिमेंत या वेळी व्यंकटराव गुंतले होते ते कोंकणांत म्हापणास देवदर्शनास जाण्याचें निमित्त करून तिकडे गेले व तेथून तोतयाकडे गेले. कांही थोडे महिने तोतयाचा उत्कर्ष झाला. त्यानें सारें कोंकण काबीज करून पुण्यावर चालून येण्याचा रोख दाखविला तेव्हां पुण्याहून भिवराव पानशे व महादजी शिंदे यांची तोतयाच्या पारिपत्यासाठीं रवानगी झाली. त्यांनीं जाऊन त्या तोतयाच्या फौजेवर छापा घालून तिची दाणादाण केली. नंतर तो तोतया आपल्या मंडळीसह मुंबईकडे गलबतांत बसून पळून जात असतां राघोजी आंग्रे यानीं त्यास सर्व मंडळीसह पकडलें. ही पकडापकड झाली तेव्हां अर्थात् व्यंकटराव व हरबाअण्णा हेही कैदेत सांपडले. परंतु आंग्र्यांनी हे थोरामोठ्यांचे लेंक, यांची बेअब्रू करूं नये, असें मनांत आणून त्यांस निसटून जाण्यास संधि दिली.
पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१३४
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(१२४)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.