पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१३३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १२३ )
दुसरे व्यंकटराव नारायण.

 सन १७७६ सालीं अनूबाईंनीं व व्यंकटरावांनीं जें एक अविचाराचें राजकारण केलें तेणेंकरून त्यांचें फार नुकसान व दुर्लौकिक झाला. त्या वेळीं त्यांचे सर्व संस्थानच खालसा व्हावयाचें, परंतु परशुरामभाऊ वगैरे पटवर्धनांच्या रदबदलीकडे व केवळ अनूबाईच्या वृद्धापकाळाकडे लक्ष देऊन सखारामबापू व नाना फडणवीस यांनीं तसें केलें नाही. त्या राजकारणाची हककित अशीः-
 पानिपतच्या गर्दीत भाऊसाहेब नाहीसे झाले त्यांचा ठावठिकाण कोणास लागला नाहीं. ते युद्धांत पडले असावे यांत संशय नाही. परंतु सामान्य लोकांची समजूत ते जिवंत आहेत व कधीं तरी परत येतील अशी होती. सुखलाल या नांवाचा कोणी कनोजा ब्राह्मण माधवराव बल्लाळ पेशव्यांच्या कारकीर्दीत आपण भाऊसाहेब आहों असे ढोंग करून फौज जमवून दंगा करूं लागला, तेव्हां त्या पेशव्यांनीं त्यास पकडून आणून पुण्यांत त्याची चौकशी केली. तींत तो तोतया आहे असें ठरल्यावरून त्यास किल्ल्यावर कैदेंत ठेविलें. सन १७६६ त तोतयाची चौकशी झाली तेव्हां अनूबाई पुण्यास होत्या. तो तोतया नसून भाऊसाहेबच असावा असें अनूबाईचे मत होते व त्यांची भ्रांति दूर करण्यासाठीं पेशव्यानीं त्या तोतयास अनूबाईच्या वाडयांत कांही दिवस ठेविले होते. परंतु त्यांची भ्रांति शेवटपर्यंत दूर झाली नाहीं ती नाहीच ! तो ततया नसून भाऊसाहेब आहे असें त्या लबाडीनेच म्हणत होत्या असें कोणी पाहिजे तर म्हणावें, परंतु त्यांच्यासंबंधे इतकें सांगणे वाजवी आहे कीं, महाराष्ट्रांत त्या वेळी त्यांच्या मताप्रमाणे पुष्कळांचे मत होते. खुद्द भाऊसाहेबाची बायको पार्वतीबाई हिलाही तो आपला नवरा आहे असें वाटत होतें. परशुरामभाऊंच्या आईस देखील तो भाऊसाहेबच आहे असें वाटत होतें. रामचंद्र गणेश, रामचंद्र नाईक परांजपे, भास्कर हरि पटवर्धन वगैरे कांहीं बडे बडे