पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१३०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १२० )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

 यानंतर कांहीं बारीकसारीक लढाया होऊन इचलकरंजी भोवतालचीं कित्येक खेडीं महादाजीपंत फडणीस यानीं घेतलीं. कित्येक खेड्यांपासून खंडणी घेतली. शिवाय अळतें व चिपरी हीं ठाणीं काबीज केलीं. उलटपक्षीं करवीरकरानीं कोडोलीच्या मुक्कामीं कोन्हेररावांचा कांहींसा पराजय करून त्यांस हुसकून लावलें. एकमेकांनीं एकमेकांचीं गांव खेडीं जाळावीं, लुटावीं, हा क्रम पावसाळा सुरू झाला तरी चाललाच होता.
 शेवटीं राजमंडळाचे वकील पुरंदरास जाऊन तेथून १७ कलमांची तहाची याद ठरून आली. त्यांत " १ करवीरकर याणीं फौज जमविली आहे तिला २० दिवसांत निरोप द्यावा. निम्मे शिम्मे फौज दूर झाली म्हणजे कोन्हेररावानींही करवीरच्या हद्दींतून आपल्या फौजेचा तळ हालवावा. त्याचप्रमाणें इचलकरंजीकरांनींही आपल्या फौजेस निरोप द्यावा. २ इचलकरंजीकरांचीं लाट व रांगोळीसुद्धां इनामगांवें व देशमुखी सरदेशमुखीसंबंधी हक्क व इनाम शेतें, कमतें वगैरे पुरातनपासून जें जें चालत आलें असेल तें करवीरकरानीं चालवावें. उत्तूर वगैरे ठाणीं घेतलीं असतील ती माघारीं द्यावीं. ३ पेशव्यांच्या मुलखांत रोखे करून घासदाणा घेतला असेल तो परत द्यावा. ४ पंतअमात्य व प्रतिनिधि व सेनापति यांजकडील तालुका व कोट किल्लेसुद्धां वतनदारी व अंमल खेडीं वगैरे पुरातनपासून त्यांजकडे चालत आलीं असतील त्याप्रमाणें चालवावें. त्यांचे गांव घेतले असतील ते माघारे द्यावे. " ही चार कलमें मुख्य होतीं. करवीरकरांच्या मनांतून तहाप्रमाणे वागावयाचे नव्हतें. कशी तरी वेळ मारून नेण्याकरितां त्यांनीं हा तह केला होता. पटवर्धन व इचलकरंजीकरसुद्धां या तहांतील शर्तींवर संतुष्ट नव्हते. अधिक जरबेचे व अधिक फायद्याचे असे करार करवीरकरांपासून घ्यावे अशी त्यांची इच्छा